लातूर : प्रतिनिधी
येथील प्रमोद देशमुख यांनी स्वत:च्या मालकीचा फ्लॅट मिस्टर नगरसेवक अंकित नंदकिशोर बाहेती यांना कराराने भाडेतत्वावर दिलेला होता. मात्र घरभाडे थकविल्याने घर खाली करण्यास सांगूनही बाहेती यांनी घराचा ताबा सोडला नव्हता. या प्रकरणी घरमालक प्रमोद देशमुख यांनी न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी न्यायालयाने प्रमोद देशमुख यांच्या बाजूने निवाडा करत मिस्टर नगरसेवकाला घराचा ताबा सोडण्याचे निर्देश दिले होते. त्या निर्देशानुसार मिस्टर नगरसेवक अंकित बाहेती यांनी आपला ताबा सोडत पोलिस बंदोबस्तात त्यांनी घरातील सामान हलवावे लागले आहे.
प्रभाग १६ मध्ये असलेल्या एका इमारतीत प्रमोद चंद्रसेन देशमुख यांचा स्वत:च्या मालकीचा फ्लॅट होता. सदर फ्लॅट मिस्टर नगरसेवक अंकित बाहेती यांनी भाडेतत्वावर घेतलेला होता. सुरुवातीला काही महिने वेळेवर घरभाडे दिले. मात्र त्यानंतर घरभाडे देण्यास टाळाटाळ करून घराचा ताबा सोडण्याची कोणतीच तयारी त्यांनी दाखविली नाही. यामुळे मनस्ताप झालेले घरमालक प्रमोद देशमुख यांनी भाडे नियंत्रण कायदा न्यायालय छत्रपती संभाजीनगर विभाग येथे धाव घेतली. याप्रकरणी घरमालक प्रमोद देशमुख यांना न्यायालयाने दिलासा देत सदर घर तात्काळ खाली करण्याचे निर्देश देवून दंडासहीत थकीत भाडे देण्याचे आदेशित केले होते. तसेच सदर घर मिस्टर नगरसेवकाच्या ताब्यात पोलीस बंदोबस्तात खाली करून घ्यावे, असेही निर्देश न्यायालयाने दिले होते. याप्रकरणी घरमालक प्रमोद देशमुख यांनी पोलीस बंदोबस्त घेवून आपल्या मालकीच्या घराचा ताबा मिळविण्यासाठी कारवाई केली. या कारवाईत मिस्टर नगरसेवक अंकित बाहेती यांनी पोलीस बंदोबस्तामुळे आपल्या घरातील सामान हलवत घराचा ताबा सोडला आहे.
















