मुुंबई : प्रतिनिधी
मुंबईच्या आझाद मैदानावर आज ९ ऑक्टोबर रोजी कुणबी समाजाने ‘ओबीसी एल्गार’ मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी अनेक ओबीसी बांधवांनी एकत्र येऊन ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर मोठे शक्तिप्रदर्शन केले.
दरम्यान, मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा समाजाला कुणबी नोंदीद्वारे ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या सरकारी धोरणाला तीव्रविरोध करत कुणबी समाजाने या मोर्चातून तीव्र विरोध दर्शविला. या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच शेकडो कुणबी कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल झाले. त्यांच्या डोक्यावर ‘जय कुणबी’ लिहिलेल्या गांधी टोप्या आणि हातात निषेधाचे फलक पाहायला मिळत आहेत. मराठा आरक्षणानंतर ओबीसी समाजाच्या या एल्गार मोर्चामुळे आरक्षणाचा मुद्दा अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
आझाद मैदानावर भव्य तयारी
आंदोलनाची तयारी भव्य होती. आझाद मैदानावर मोठे व्यासपीठ आणि मंडप उभारण्यात आला होता. सकाळी दहा वाजल्यानंतर ओबीसी समाजाचे नेते या व्यासपीठावरून आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. या आंदोलकांची मुख्य मागणी ही मराठा समाजाच्या कुणबी किंवा मराठा-कुणबी नोंदींद्वारे ओबीसी आरक्षणात शिरकाव करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना तीव्र विरोध दर्शवणारी आहे. मराठा आरक्षणाच्या घोषणेनंतर ओबीसी समाजाच्या अस्तित्वाची ही लढाई असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
राज्यातील आरक्षणाचे राजकारण
या आंदोलनाच्या माध्यमातून कुणबी समाजाच्या कार्यकर्त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. सरकारने आमच्या आरक्षणाच्या मुद्याकडे तातडीने लक्ष देऊन आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आजचा हा मोर्चा भविष्यात अधिक उग्र आंदोलनाचे रूप घेईल, असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या नोंदींवरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, आजच्या या मोर्चाने राज्यातील आरक्षणाचे राजकारण निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे.

