मुंबई : प्रतिनिधी
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाड परिसरात रविवारी रात्री एक भीषण रस्ता अपघात घडला. या अपघातात २० जण जखमी झाले असून, एका ३५ वर्षीय महिला वकिलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अॅड. प्रियांका मयंक सत्रा असे मृत महिलेचे नाव असून त्या मालाड पश्चिम येथील रहिवासी आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, मालाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एस. व्ही. रोड आणि मामलेदार वाडी रोड जंक्शनवर रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक लोखंडे, पोलिस उपनिरीक्षक जाधव आणि त्यांचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला.
कृष्णा शांताराम चमनकर हा चालक आपल्या कारने जात असताना, त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने तीन रिक्षा आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार आणि रिक्षातील प्रवाशांसह २० जण जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान अॅड. प्रियांका सत्रा यांचा मृत्यू झाला.
















