मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. मंदिरातील प्रसादाचे लाडू बनवताना गरम पाण्याचा टोप अंगावर पडून झालेल्या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या एका कंत्राटी कर्मचा-याचा मृत्यू झाला आहे. सचिन रसाळ असं मृत कर्मचा-याचं नाव आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार प्रभादेवी सिद्धिविनायक मंदिरामध्ये लाडू बनवण्याचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. सचिन रसाळ या कंत्राटी कर्मचा-यावर गरम पाण्याचा टोप पडल्याने त्यात तो सुमारे ६० टक्के भाजला होता. दरम्यान, उपचार सुरू असताना गुरुवारी त्याचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेनंतर स्वयंपाक घरातील सुरक्षा यंत्रणा आणि अपघाताच्या नेमक्या कारणाबाबत आता दादर पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. सचिन रसाळ हा कोकणातील दिवाण खवटी गावातील रहिवासी होता. तसेच सध्या तो वसई-विरार येथे भाड्याच्या घरात राहत होता. दरम्यान, मृत सचिन रसाळ याच्या कुटुंबीयांना कंत्राटदाराकडून मदत दिली जाणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.
















