मुंबई : प्रतिनिधी
पश्चिम उपनगरातील विलेपार्ले ( पश्चिम) परिसरात मंगळवारी रात्री एका निवासी इमारतीच्या ११ व्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत एक तरूणीसह अडीच वर्षांच्या लहानग्याचा होरपळून मृत्यू झालाय. या घटनेत एकूण ४ जण जखमी झाले असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
विलेपार्ले येथील बॅप्टिस्टा रोडवरील शांता भवन या १२ मजली इमारतीला मंगळवारी रात्री अचानक आग लागली. ही आग इमारतीच्या ११ व्या मजल्यावरील दोन फ्लॅट्समध्ये ही आग लागली होती. मुंबई अग्निशमन दलाला मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार, ११ ऑगस्टच्या रात्री अग्निशमन दलाला आगीची प्रथम माहिती मिळाली होती. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले होते.
उंच इमारतीच्या वरच्या मजल्यावर लागलेली ही आग तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आटोक्यात आणली. मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास कुलिंग ऑपरेशन पूर्ण करत आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. आग नेमकी कशामुळे लागली याचे अचूक कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र ११ व्या मजल्यावरील इलेक्ट्रिक वायरिंग, एसी युनिट आणि घरातील साहित्याला ही आग लागली होती. त्यामुळे शॉर्ट सर्किट हे आगीच प्राथमिक कारण असल्याचं अग्निशमनदलाच्यावतीनं स्पष्ट करण्यात आले.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ जणांना तातडीनं नजीकच्या नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यात दुर्दैवानं अबीर (वय ३ वर्षे) आणि अंकिता (वय २३ वर्षे) या दोघांचा रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.
















