मुंबई : प्रतिनिधी
जन्मलेल्या १६ टक्के नवजात शिशुंमध्ये श्रवणदोष आढळला आहे. म्हणजेच, प्रत्येक सहावे मूल ऐकण्यास असमर्थ आहे. कामा रुग्णालयात झालेल्या तपासणीत हे निष्कर्ष समोर आले आहेत. त्यामुळे वेळेत निदान व उपचार न झाल्यास ही मुले आयुष्यभरासाठी बहिरी राहू शकतात, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
कामा रुग्णालयात नोव्हेंबर २०२४ पासून आजपर्यंत १५२ नवजात शिशुंची तपासणी झाली. त्यापैकी २५ शिशुंना वेगवेगळ्या पातळीवरील श्रवणदोष असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांच्या मते, वेळेवर निदान झाल्यामुळे या मुलांवर त्वरित उपचार सुरू झाले आहेत.
या मुलांची ओटो-अकॅस्टिक एमिशन नावाची चाचणी पूर्णपणे वेदनारहित असून जन्मानंतर ४८ ते ७२ तासांत केली जाते. शिशूच्या कानात छोटा प्रोब ठेवून ध्वनी लहरी सोडल्या जातात आणि अंतर्गत प्रतिसाद मोजला जातो. दोष लवकर आढळल्यास वेळेत उपचार करता येतात. डॉक्टरांच्या मते, वेळेवर निदान व हस्तक्षेप झाल्यास कॉख्लिअर इम्प्लांट सारख्या तंत्रज्ञानाद्वारे ऐकण्याची क्षमता सुधारता येते. त्यामुळे मुलांच्या जीवनगुणवत्तेत मोठा बदल घडू शकतो.
सर्व नवजात शिशुंसाठी चाचणी आवश्यक
अनिवार्य ‘ओएई’ चाचणी लागू करावी, अशी मागणी रुग्णालय प्रशासनाने केली आहे. लवकर निदान केल्यास आयुष्यभराच्या कर्णदोषापासून बचाव शक्य असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.

