26.9 C
Latur
Thursday, January 22, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईवर भाजपची वाईट नजर

मुंबईवर भाजपची वाईट नजर

पंतप्रधान, गृहमंत्री महापालिकेच्या प्रचारात; आमदार वडेट्टीवार यांची परखड टीका

चंद्रपूर : प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत याआधी देशाचे पंतप्रधान प्रचारासाठी आले नव्हते, किंवा गृहमंत्री देखील प्रचारात सहभागी झाले नाहीत. पंतप्रधान व गृहमंत्री यांची नजर मुंबईवर आहे. त्यांना महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्यासाठी मुंबईला लुटायचे आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचे आहे. त्यांची वाईट नजर मुंबईवर आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी ८ जानेवारी रोजी प्रथमच महापालिका निवडणूक प्रचारात उडी घेत काँग्रेस उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी भाजपने आक्रमक प्रचाराची रणनीती आखली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही तोफा धडाडणार आहेत.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपुरातील भाजपचा अंतर्गत वाद सुधीर कमळ बघ, किशोर कमळ बघ, हंसराज कमळ बघ इथपासून आता प्रचार फलकावर शेण फेकण्यापर्यंत पोहोचला आहे असेही वडेट्टीवार म्हणाले. चंद्रपुरात भाजपमध्ये जे चित्र आहे ते बघता अतिशय वाईट वाटते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगावे लागत आहे की, सुधीर कमळ बघ, किशोर कमळ बघ. मात्र तरीही हे कमळ बघत नाहीत. सुधीर कमळ बघण्याऐवजी किशोर बघतात तर किशोर देखील सुधीर बघतात म्हणून आम्ही सांगतो ‘नांदा सौख्यभरे’ असेही वडेट्टीवार म्हणाले.

सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ जानेवारी रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांच्या हस्ते ‘पद्मभूषण’ पुरस्कारप्राप्त आचार्य श्री रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज यांनी लिहिलेल्या ५००व्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जैन समाजातील मतदारांपर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबईतील मोठ्या प्रमाणावरील उत्तर भारतीय मतदारांचा विचार करता, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अभिनेते मनोज तिवारी, रवी किशन, गायक निरहुआ आणि मैथिली ठाकूर यांनाही प्रचारासाठी पाचारण करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात ४० ते ४५ प्रचारसभांचे नियोजन करण्यात आले असून, मुंबई महानगर क्षेत्रातील पालिकांसाठी ११, १२ आणि १३ जानेवारी रोजी देशभरातील स्टार प्रचारकांची फौज उतरवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रचार मोहिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्री आणि नामवंत प्रचारक सहभागी होणार आहेत.

राज्यात गुंडांचा अड्डा
भाजपने महाराष्ट्रात गुन्हेगारांचा अड्डा केला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी वाट्टेल ते करत आहेत. पोलिस यंत्रणा वापरली जाते आणि त्यापलीकडे जाऊन दहशत माजवण्यासाठी गुंडांना वापरले जात आहे. ठरवून दहशत पसरवली जाते. महाराष्ट्राची अध:पतन करण्याची संस्कृती निर्माण झाली. निवडणुका नि:पक्षपातीपणे झाल्या पाहिजेत. निवडणूक आयोग सरकारचा नोकर म्हणून वागत असेल तर निवडणूक आयोगाचा उपयोग काय? खुलेआम मारामारी सुरू आहे, पैसे वाटप सुरू आहे आणि तरीही कारवाई होत नाही. आता तुरुंगातील गुन्हेगार पण बाहेर काढा. सत्ताधा-यांना ते निवडणूक जिंकण्यासाठी मदत करतील, असेही वडेट्टीवार म्हणाले.

भाजप पदाधिका-यांच्या भ्रष्टाचारामुळे जनता संतप्त
चंद्रपूर महापालिकेत भाजपची साडेसात वर्षे सत्ता होती. या सत्ताकाळात भाजप पदाधिका-यांनी मोठा भ्रष्टाचार केला. त्यामुळे आता जनता त्यांना आरसा दाखवत आहे. जनतेचा उद्रेक दिसत आहे. विकासाचा पत्ता नाही. शहरात दीड हजार कोटींपेक्षा अधिकची विकास कामे झाली आहेत. मात्र शहरात विकास कुठेच दिसत नाही. भाजप महापौरांनी टक्केवारी घेऊन आपली घरे भरली. लोकांची कामे केली नाहीत. त्यामुळेच आता शहरातील जनता भाजप नेत्यांच्या प्रचार फलकावर शेण फेकत आहे, अशीही टीका वडेट्टीवार यांनी यावेळी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR