मुंबई : प्रतिनिधी
मुंबईसह राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे असे वाटत असतानाच मंगळवारी (११ ऑगस्ट) पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ४ वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी ७ वाजेपर्यंत पावसाचा जोर कमी झाला असला तरीही अनेक भागांत पावसाच्या तुरळक सरी बरसात असल्याचे समोर आले आहे. अशामध्ये भारतीय हवामान खात्याने महत्त्वाचा इशारा दिला आहे. मंगळवारी रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, वायव्य बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून सुमारे ७.६किलोमीटर उंचीवर चक्राकार वा-यांची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे बुधवारी (१२ ऑगस्ट) या भागात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे, हवामानात बदल झाल्याचे सांगण्यात येत आहे. अशामध्ये कोकण विभागातील बहुतांश भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. पण बहुतांश भागांत पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. तसेच, मराठवाड्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरीही, या भागांत पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पालघर, ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. पण, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नाशिकच्या घाटमाथा परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. घाटमाथा परिसरात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता कायम राहणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत पाऊस, तर काही भागांत कोरडे हवामान असे मिश्र चित्र पाहायला मिळेल. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमधील काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता असली, तरी बहुतांश भागांत पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे.
















