Homeराष्ट्रीयमुख्यमंत्रिपद सोडण्यास ममता बॅनर्जींचा नकार

मुख्यमंत्रिपद सोडण्यास ममता बॅनर्जींचा नकार

निवडणूक हरलो नाही, हरविले गेले, भाजपवर हल्लाबोल
कोलकाता : वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. आम्ही निवडणूक हरलो नाही, आम्हाला हरवण्यात आले आहे. भाजपाने निवडणूक आयोगाचा वापर करून विजय मिळवला आहे. दरम्यान, निवडणूक निकालानंतर आपल्याला सोनिया गांधी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव आणि हेमंत सोरेन यांचा फोन आल्याचे सांगितले. पुढील काळात इंडिया आघाडी मजबूत करणार, असा निर्धार बोलून दाखविला.

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, इंडिया आघाडीतील सर्व पक्षांकडून ते पूर्णपणे आमच्या सोबत असल्याचे सांगितले. आमची एकता पुढील काळात आणखी भक्कम होईल, असे त्या म्हणाल्या. अखिलेश यादव यांनी आज बंगालमध्ये येण्यासंदर्भात विनंती केली होती. त्यांना उद्या यावे, असे सांगितल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. एका पाठोपाठ एक असे सर्व जण येतील. माझे लक्ष्य स्पष्ट आहे. एका लहान व्यक्तीप्रमाणे मी इंडिया आघाडीची टीम मजबूत करणार आहे. आता माझ्याकडे कोणतेही पद नाही, आता मी सर्वसामान्य आहे. त्यामुळे तुम्ही आता मला पदाचा वापर करताय, असे म्हणून शकत नाही, आता मी मुक्त आहे. मी माझे सर्व आयुष्य लोकांच्या सेवेसाठी दिले आहे. गेल्या १५ वर्षात पेन्शनमधून एक रुपया घेतला नाही. पगाराचा एक पैसाही घेतला नाही. मी आता मुक्त असून आता मला काही काम करायचे आहे, मी ते करणार आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

ममता बॅनर्जींनी सत्यशोधन समिती स्थापन करणार असल्याचे म्हटले. सत्यशोधन समिती १० सदस्यांची असेल. त्यात ५ खासदारांचा समावेश असेल, असे म्हटले. हे सदस्य ज्या भागात अत्याचार झाला, तिथे जाईल, असे बॅनर्जी यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये जे घडले, तो काळा इतिहास आहे, असे बॅनर्जी यांनी म्हटले.

मी पराभूत झालेली नाही
ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देणार नसल्याचे म्हटले. मी पराभूत झालेली नाही. मी राजभवनात जाणार नाही, तो प्रश्नच येत नाही. आम्ही पराभूत झालेलो नाही, त्यांनी आम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न केला. अधिकृतपणे निवडणूक आयोगामार्फत ते आम्हाला पराभूत करू शकतात. मात्र, नैतिकदृष्ट्या निवडणूक जिंकल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

मुख्य निवडणूक
आयुक्त व्हिलन
ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि निवडणूक आयोगाने लोकशाही अधिकारांची लूट केल्याचा आरोप केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार व्हिलन असल्याचे बॅनर्जींनी म्हटले.

९ मे रोजी भाजपच्या
मुख्यमंत्र्यांचा शपथविधी
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत १५ वर्षे राज्य करणा-या तृणमूल काँग्रेसला शंभरीही गाठता आली नाही. टीएमसीला ८० जागांवरच विजय मिळवता आला. इतकेच नव्हे माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे सुवेंदु अधिकारी यांनी ७३,९१७ मते मिळवली तर ममता बॅनर्जी यांना ५८,८१२ मते मिळाली. आता नव्या भाजप मुख्यमंत्र्यांचा शपथविधी ९ मे रोजी होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR