मुंबई : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. त्याअनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेतून बंड केले होते. तेव्हा त्यांनी सूरत आणि त्यानंतर गुवाहाटीचा दौरा केला होता. यावेळी महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
गुवाहाटीचा दौरा केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली होती. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमधील कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते.
प्रचाराचे रणशिंग फुंकणार
आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रचाराचा नारळ कामाख्या देवीच्या मंदिरात फोडल्यानंतर ते राज्यात प्रचाराचे रणशिंग फुंकणार असल्याचे सांगितले.