काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा टोला
मुंबई : प्रतिनिधी
कटकारस्थान, बेईमानी आणि असंवैधानिक मार्गाने सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील खोके सरकारने पत्रकार परिषदेत केलेले विकासाचे सर्व दावे खोटे तसेच बनावट आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्र सर्वच आघाड्यांवर नंबर एक होता; पण फडणवीसांच्या काळात तसेच शिंदे सरकारच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली हे उघड सत्य आहे. आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राची गुजरातच्या हस्तकांनी मागील २ वर्षात मात्र पुरती वाट लावली. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिपोर्ट कार्डवर बोलणे हास्यास्पद असल्याने त्यांनी रेट कार्डवर बोलले पाहिजे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी लगावला.
महायुतीच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत सरकारच्या गेल्या २ वर्षातील कामांची माहिती देणारे रिपोर्ट कार्ड प्रकशित केले. या रिपोर्ट कार्डमध्ये केलेल्या दाव्यांची पोलखोल करताना नाना पटोले म्हणाले, या सरकारने २ वर्षात मोदी-शाह यांच्या आदेशाने महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले, असा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्र हे मोदी-शाह यांच्यासाठी फक्त एटीएम आहे. राज्यात प्रस्तावित असलेले मोठे प्रकल्प गुजरात आणि इतर राज्यात पळवून नेले. त्या वेळी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार मूग मिळून गप्प बसले होते. फडणवीस यांनी तर गुजरातमध्ये गुंतवणूक होते त्याचे समर्थन केले होते. राज्यातील उद्योगधंदे दुस-या राज्यात गेल्याने महाराष्ट्रात बेरोजगारांची फौज तयार झाली आहे. उद्योगधंदे गुजरातला आणि गुजरातचे ड्रग्ज महाराष्ट्रात आणून तरुण पिढी बरबाद करण्याचे पाप या सरकारने केले आहे.