26.6 C
Latur
Friday, November 7, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांसमोरच भुमरे-शिरसाट-दानवे यांच्यात कानगोष्टी!

मुख्यमंत्र्यांसमोरच भुमरे-शिरसाट-दानवे यांच्यात कानगोष्टी!

काजू खात तिघांमध्ये हास्यविनोदही रगंला 

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल छत्रपती संभाजीनगर दौ-यावर होते. महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. याचा कार्यक्रमात व्यासपीठावर खासदार संदीपान भुमरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट हे एकाच सोफ्यावर शेजारी बसले होते. ऐरवी एकमेकांचे वस्त्रहरण करणारे हे तीन नेते एकाच प्लेटमधील काजू खात हास्यविनोदही करत होते. कानामध्ये कुजबुज आणि त्यावर हसत एकमेकांना दाद देतानाचे हे चित्र पहायल्यानंतर हे खरेच विरोधक आहेत, की याची मिलिभगत? असा प्रश्न उपस्थितांना पडला.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी शिवसेनेत फूट पडल्यापासून खासदार संदीपान भुमरे, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर अनेकदा सडकून टीका केली आहे. एवढेच नाही नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात दानवे यांनी सभागृहात संजय शिरसाट यांच्यावर राजकीय दबाव आणत हॉटेल खरेदीचा प्रयत्न, एमआयडीसीतील भूखंड यासह अनेक विषय मांडले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत कारवाईचा आग्रही धरला. दुसरीकडे खासदार संदीपान भुमरे यांच्यावरही त्यांच्या दारूच्या दुकानांवरून टीकेची झोड उठवत लक्ष्य केले होते.

शिवसेनेत फूट पडल्यापासून गेली २०-२५ वर्ष सोबत काम केलेल्या आणि आता एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणा-या दानवे-शिरसाट आणि भुमरे यांच्यात मुख्यमंर्त्यांसमोर चांगलीच गट्टी जमल्याचे दिसून आले. हे चित्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या असल्या तरी सगळं करून नामानिराळं राहण्याची कला अवगत असलेल्या या नेत्यांनी सोयीस्कररित्या आम्ही एकमेकांचे विरोधकच आहोत. विकासकामासाठी मात्र एकत्र असल्याचे सांगत वेळ मारून नेली. अंबादास दानवे यांना या एकत्र काजू खाण्या संदर्भात जेव्हा विचारले तेव्हा, त्यांचा चेहरा चांगलाच पडला होता.

समोर पन्नास प्लेट ठेवलेल्या नव्हत्या, त्यामुळे एकाच प्लेटमध्ये ठेवलेले काजू आम्ही खाल्ले तर बिघडले कुठे? याचा अर्थ आम्ही एकत्र आहोत, असा होत नाही. शिवाय ते काजू मला गोड लागले नाही, असे म्हणत चेह-यावरची नाराजी लपवण्याचा प्रयत्न केला. तर खासदार संदीपान भुमरे यांनी मात्र काजू त्यांना गोड लागले नसते, तर त्यांनी ते खाल्लेच नसते, असा टोला लगावला. भविष्यातही त्यांना आमचे काजू गोडच लागतील, असे म्हणत त्यांची टर्म संपत असल्याकडे भुमरे यांनी लक्ष वेधले. संजय शिरसाट यांनी मात्र यावर भाष्य करणेच टाळले.

अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्­यांच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेता म्हणून हजेरी तर लावली, पण सरकारने शहरवासियांची फसवणूक केल्याची टीकाही केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR