मुरुड : प्रतिनिधी
मुरूड शहराची वाढती लोकसंख्या तसेच परिसरातील नागरिकांची वाढती आरोग्यसेवेची गरज लक्षात घेऊन आघाडी सरकारच्या काळात ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी तब्बल २६ कोटी रुपयांचा निधी माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी मंजूर करून घेतला होता. सध्या या उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम वेगाने प्रगतीपथावर असून माजी आमदार धिरज देशमुख यांनी प्रत्यक्ष भेट देत कामाची पाहणी केली. यावेळी सुरू असलेल्या बांधकामाचा सविस्तर आढावा घेत संबंधित बांधकाम विभागाच्या अधिका-यांना व ठेकेदारांना आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या.
तसेच वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टरांशी चर्चा करून भविष्यात मुरूड व परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम, आधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी संवाद साधला. ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, यासाठी हे रुग्णालय महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. हे उपजिल्हा रुग्णालय भविष्यात मुरूड व परिसरातील नागरिकांसाठी मोठा आधार ठरणार असून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी देणारे ठरेल, अशा भावना माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केल्या. यावेळी लातूर पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले, उपसभापती महेश चव्हाण यांच्यासह विविध संस्था पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष,कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.
















