बारामती : प्रतिनिधी
बारामतीमध्ये एक अतिशय धक्कादायक अशी घटना घडली. मुलाचा आणि दोन नातींचा अपघातात मृत्यू झाल्याचा धक्का बसल्याने आजोबांचा देखील मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील चार जणांनी जगाचा निरोप घेतल्याने गावात शोककळा पसरली. आज पहाटे आजोबांचे हृदयविकाराने निधन झाले. आपल्या मुलाचा आणि दोन नातीचा अपघातात मृत्यू झाल्याचा धक्का बसून आजोबा राजेंद्र आचार्य यांनी जीव सोडला. मुलगा वडील राजेंद्र आचार्य हे आजारी असल्याने त्यांना फळ आणण्यासाठी बाहेर गेला असता हा अपघात झाला.
बारामतीतील मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात काल रविवारी भीषण अपघात झाला होता. या अपघातात वडील आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुलींसह तिघाजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका डंपरने त्यांच्या दुचाकी गाडीला धडक दिली आणि यात दुचाकी डंपरच्या चाकाखाली गेल्याने तिघेही चेंगरले गेले. यात वडिल आणि दोन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेत ओंकार आचार्य, त्यांची चार वर्षाची मुलही मधुरा आणि दहा वर्षाची सई मृत्यू यांचा मृत्यू झाला. घरातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी मुलीचे आजोबा यांना समजली आणि याचा धक्का ७० वर्षीय आजोबाला बसला. आज पहाटे मयत मुलीचे आजोबा राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचे देखील हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. घरातील चौघांचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने बारामती आणि इंदापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

