Homeसंपादकीयमुलींचे वर्चस्व कायम !

मुलींचे वर्चस्व कायम !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. गतवर्षीप्रमाणे यंदाही बारावीचा निकाल घसरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकालात तब्बल २.०९ टक्क्यांची घट झाली आहे. या निकालात सर्वाधिक ९४.१४ टक्के निकाल कोकण विभागाचा तर सर्वांत कमी ८४.१४ टक्के निकाल लातूर विभागाचा लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालावर मुलींनी वर्चस्व कायम ठेवले आहे. बारावी परीक्षेसाठी राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच आय.टी.आय विषयाच्या परीक्षा घेण्यात आल्या. एकूण १४ लाख ३३ हजार ५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.७९ आहे. विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९६ टक्के लागला. कला शाखेची टक्केवारी सर्वांत कमी आहे. सर्व विभागीय मंडळातून एकूण ६ लाख ७४ हजार ८७४ मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी ६ लाख २८ हजार ६९९ मुली उत्तीर्ण झाल्या. या नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.१५ आहे.

२०२०पासून सलग नव्वदीपार लागणारा बारावीचा निकाल प्रथमच खाली आला. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणा-यांची संख्याही गतवर्षीच्या तुलनेत ८४२ ने घटली. गत चार वर्षांत निकालाची टक्केवारी सातत्याने ९० टक्क्यांच्या वर होती. नव्वद टक्क्यांहून अधिक गुण घेणा-यांची संख्याही वाढत होती. त्यामुळे बारावीच्या निकालाला एकप्रकारे आलेली ही सूज असल्याची प्रतिक्रिया शिक्षणतज्ज्ञ देत होते. या पार्श्वभूमीवर यंदाची टक्केवारी ही सूज उतरून निकाल पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचे चिन्ह मानले जाते. राज्य मंडळाच्या निरीक्षणानुसार, प्रभावीपणे राबविलेली कॉपीमुक्त मोहीम हेही निकाल घटण्याचे एक प्रमुख कारण आहे. यंदा मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ६.३५ टक्क्यांनी जास्त आहे. बारावीच्या परीक्षेदरम्यान राज्यात कॉपीमुक्त मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. ९० टक्क्यांहून अधिक केंद्रांवर सीसीटीव्ही उपलब्ध होते. त्यामुळे गैरप्रकारावर लक्ष ठेवणे शक्य झाले. बारावीच्या निकालात लातूर मंडळाची यंदा ८४.१४ टक्क्यांपर्यंत मोठी घसरण झाली असून प्रथमच सर्वांत कमी निकाल लागला आहे. लातूर जिल्ह्याचा निकाल ८९.८२ टक्के आहे. सर्वांत कमी निकाल इंग्रजी विषयाचा (८४.६६ टक्के) आहे.

मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८९.७५ टक्के तर मुलांचे ७९.४५ टक्के आहे. म्हणजे निकालात १० टक्क्यांनी मुली सरस आहेत. यंदा परीक्षा केंद्रावर परीक्षेची जबाबदारी असलेल्या कर्मचा-यांकडून गैरप्रकार झाल्याची काही प्रकरणे उघडकीस आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मंडळाने १०० कर्मचा-यांना निलंबित केले. यात अमरावती विभागात ५० कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील ४३ कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले. मंडळाने पहिल्यांदाच अशी कठोर कारवाई केली आहे. नागपूर विभागातील ४ आणि लातूर विभागातील ३ अशी एकूण १०० कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यापूर्वी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका निकालानंतर १० दिवसांत मिळत होत्या तर प्रमाणपत्र सहा महिन्यांनी मिळत असे. मात्र यंदापासून पहिल्यांदाच गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र एकाच दिवशी देण्यात येणार आहेत. आधारप्रमाणे निकाल आणि प्रमाणपत्रावर नाव असणार असून त्यानुसार वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव असेल. बारावीचा मुंबई विभागाचा सर्व शाखांचा एकत्रित निकाल ९०.०८ टक्के लागला आहे. राज्याच्या निकालाप्रमाणेच मुंबई विभागाच्या निकालात मोठी घसरण झाली आहे. यंदा मुंबईचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत २.८५ टक्क्यांनी घसरला आहे.

मुंबईच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. मुंबईतील तीन महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के आहे. यंदा परीक्षेतील १५३ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. घरून परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८०.२१ टक्के आहे. अलीकडे पाल्याला शाळेत न पाठवता घरीच त्याचा अभ्यास घेण्याकडे कल वाढला आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा निकालाची आकडेवारी काहीशी चिंताजनक असून गत पाच वर्षांतील हा सर्वांत नीचांकी निकाल ठरला आहे. त्यामुळे राज्याच्या बारावी निकालाचा टक्का घसरल्याचे स्पष्ट झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालासंदर्भात कोकण विभागाने आपले अव्वल स्थान आणि वर्चस्व कायम राखले आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९४.१४ टक्के लागला आहे. येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. शैक्षणिक पॅटर्नसाठी प्रसिद्ध असलेल्या लातूरची मात्र घसरण झाली. एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या उत्कृष्ट ‘शैक्षणिक पॅटर्न’साठी नावाजल्या गेलेल्या लातूर विभागाला मात्र मोठा फटका बसला आहे. हा विभाग निकालाच्या बाबतीत राज्यात सर्वांत शेवटी आहे.

लातूरची ही घसरण शिक्षण क्षेत्रातील अनेकांसाठी धक्कादायक मानली जात आहे. यंदाच्या निकालाने गत पाच वर्षांतील सर्वांत कमी टक्केवारीची नोंद केली आहे. कोरोना काळानंतरच्या परीक्षा पद्धतीतील झालेले बदल, मूल्यमापनाचे कठोर नियम आणि विद्यार्थ्यांच्या लेखनातील बदल या सर्व कारणांचा परिणाम निकालाच्या टक्केवारीवर झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. राज्य मंडळाने बारावीचा निकाल नीट परीक्षेच्या आदल्या दिवशी जाहीर करण्याचा घेतलेला निर्णय पालकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. ३ मे रोजी होणा-या ‘नीट’ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणारा ठरू शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. निकालाची ही वेळ नीट-यूजी परीक्षा देणा-या हजारो विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम करू शकते असे पालकांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेपूर्वी विद्यार्थी आधीच तणावाखाली असतात. अशावेळी निकाल जाहीर झाल्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होऊन तणाव आणि चिंतेत भर पडण्याची शक्यता असते. विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR