मेरठ : प्रेमाचा त्रिकोण, विश्वासाचा घात आणि पतीची निर्घृण हत्या मेरठच्या गुन्हेगारी जगतातील या तीन धक्कादायक कहाण्या ऐकून भल्याभल्यांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. आता मेरठचे चौधरी चरण सिंह जिल्हा कारागृह सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. आपल्याच पतीचा जीव घेणा-या तीन कुख्यात महिलांचा मुक्काम आता याच तुरुंगात असून त्यामुळे प्रशासनासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
देशभरात गाजलेल्या प्रसिद्ध निळा ड्रम हत्याकांडातील मुख्य आरोपी मुस्कान आधीपासूनच या तुरुंगात बंदिस्त आहे. आता तिच्यापाठोपाठ ‘सापाचा डंख’ मारून नव-याची हत्या करणा-या दामिनीचीही याच जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, याच तुरुंगात काही महिन्यांपूर्वी बबीता नावाच्या महिला कैद्याचाही मुक्काम होता, जिच्यावरही अशाच प्रकारे पतीची हत्या केल्याचा आरोप होता.
निळा ड्रम हत्याकांड आणि मुस्कानचा थरार
काही महिन्यांपूर्वी मेरठमधील निळा ड्रम हत्याकांड संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला होता. मुस्कान नावाच्या महिलेने आपल्या प्रियकराच्या प्रेमात आंधळे होऊन पती सौरभची निर्घृण हत्या केली होती. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी सौरभचा मृतदेह एका मोठया निळ्या ड्रममध्ये लपवून ठेवण्यात आला होता.
दामिनीने सापाकडून करवून घेतली हत्या
मुस्काननंतर आता याच तुरुंगात हस्तिनापूर भागातील साप कांडमधील आरोपी दामिनी दाखल झाली आहे. दामिनीने तिचा प्रियकर तुषार याच्यासोबत मिळून पती अतुल पवार याच्या हत्येचा भयंकर कट रचला. पोलिस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, दामिनीने एका गारुड्याकडून विषारी साप खरेदी केला. त्यानंतर या सापाचा डंश देवून पती अतुलचा जीव घेतला.
१६ महिन्यांपूर्वी बबीताचाही कट
१६ महिन्यांपूर्वी मेरठच्या बहसूमा भागात असाच एक प्रकार समोर आला होता. तेथे बबीता नावाच्या महिलेने आपल्या पतीला सापाकडून चावा देऊन मारल्याचा आरोप होता. तिलाही याच चौधरी चरण सिंह जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. पती-पत्नीच्या पवित्र नात्यात विश्वासघात करून प्रियकरासाठी पतीचा काटा काढण्याच्या वाढत्या घटनांमुळे समाजात तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. मेरठमध्ये समोर आलेल्या या तिन्ही प्रकरणांमध्ये एक मोठी समानता म्हणजे अनैतिक प्रेमसंबंध. अनैतिक संबंधांच्या मोहात पडून आपल्याच कुंकवाचा बळी देणा-या या महिला आता गजाआड असून पोलिस आणि तपास यंत्रणा या प्रकरणांत ठोस पुराव्यांच्या आधारे कडक कारवाई करत आहेत.















