लातूर : प्रतिनिधी
पांडुरंगाचा भक्त जात, पात, धर्म, प्रांत बदलून आहे असाच अनुभव लातूरच्या दगडी बांधकाम करणा-या गणी सय्यद मिस्त्री यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी एक किलो चांदीचा मुकुट विठ्ठल रुक्मिणी मंदिरचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मासिक वारी करणारे विठ्ठल भक्त जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांच्या उपस्थितीत गणी सय्यद मिस्त्री यांनी मंदिर संस्थानला अर्पण केला. यावेळी केशव कोद्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सध्या धार्मिक कार्यक्रमाने सामाजिक वातावरण गढूळ झाले असताना लातूरच्या मुस्लिम गणी सय्यद मिस्त्री यांनी सर्वधर्म समभावतेचा अनोखा संदेश दिला आहे. सध्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जीर्णोद्धारचे काम सुरू असून येथे सुरू असलेल्या कामासाठी दगड फोडणे, पुरवणे त्यांना काम मिळाले होते. त्यामुळें त्यांचे जाणे येणे जास्त झाले. इथे काम करत असल्याने त्यांना आपल्याला विठ्ठल पावला आपण काही तरी विठ्ठल चरणी सेवा करावी अशी ईच्छा व्यक्त केली
त्यानंतर त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानच्या कार्यालयात चांदीचा मुकुट अर्पण केला. याबद्दल मंदिर समितीकडून त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गणी सय्यद मिस्त्री हे अनेक मंदिराच्या दगडी बांधकामासाठी प्रसिद्ध आहेत. लातूर जिल्ह्यातील अनेक गावातील दगडी बांधकाम करणा-या मंदिराला त्यांनी दगड पुरवण्याचे काम केले आहे. त्यांच्या या सर्वधर्म समभावतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.