16.9 C
Latur
Sunday, November 9, 2025
Homeअंतरराष्ट्रीयमॅकडोनाल्ड्स, वॉलमार्टवर अमेरिकी जनतेचा बहिष्कार

मॅकडोनाल्ड्स, वॉलमार्टवर अमेरिकी जनतेचा बहिष्कार

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेतील दोन महाकाय कंपन्या वॉलमार्ट आणि मॅकडोनाल्ड्स यांच्याविरोधात देशव्यापी बहिष्काराची घोषणा करण्यात आली आहे. ‘द पीपल्स युनियन यूएसए’ या पुरोगामी गटाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन १ ऑगस्टपासून सुरू झाले असून, संपूर्ण महिनाभर चालणार आहे.

कंपन्यांकडून होणारे कामगारांचे शोषण, करचुकवेगिरी आणि सामाजिक जबाबदारीचा अभाव या मुद्द्यांवरून अमेरिकन नागरिकांना या कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘द पीपल्स युनियन यूएसए’ या संघटनेने वॉलमार्ट आणि मॅकडोनाल्ड्सवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळेच अमेरिकन नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून, त्यांनी या कंपन्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. या आंदोलनाचा मुख्य उद्देश मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या मनमानी कारभाराला विरोध करणे आणि स्थानिक लहान व्यवसायांना प्रोत्साहन देणे हा आहे.

‘द पीपल्स युनियन यूएसए’चे संस्थापक जॉन श्वार्झ यांनी म्हटले आहे की, कॉर्पोरेट कंपन्यांच्या अनियंत्रित सत्तेमुळे जे काही चुकीचे घडत आहे, वॉलमार्ट त्या सर्वांचे प्रतीक आहे. या महिनाभराच्या बहिष्कारादरम्यान, लोकांना वॉलमार्ट आणि मॅकडोनाल्ड्समधून कोणतीही खरेदी न करता स्थानिक आणि लहान दुकानांना पाठिंबा देण्यास सांगितले जात आहे. या आंदोलनाला नागरिकांकडून किती प्रतिसाद मिळतो यावर त्याचे यश अवलंबून असेल.

मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेल्या या आंदोलनाने अमेरिकेतील कॉर्पोरेट कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या सामाजिक जबाबदारीवर एक मोठी चर्चा सुरू केली आहे, हे निश्चित.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR