लातूर : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, दिव्यांग सक्षमीकरण विभाग आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे दिव्यांगजनांसाठी विशेष मेंदूविकार आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ७६ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार करून त्यांना पुढील ३ महिन्यांसाठी आवश्यक असणा-या औषधांचे मोफत वितरण करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय संचलित ‘संवेदना प्रकल्प’ (हरंगुळ बु.) यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. देवाशिष रुईकर, माजी जिल्हा परिषद सदस्य त्रिंबकअप्पा गुट्टे आणि किनगावचे प्रभारी सरपंच विठ्ठलराव बोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जाधव, डॉ. विठ्ठल घुगे आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे व्यवस्थापक बसवराज पैके यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरात किनगावसह अंधोरी, सताळा तसेच अहमदपूर, उदगीर व चाकूर परिसरातील रुग्णांनी व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. रवीना कलवले, औषध निर्माता बुके यांच्यासह आरोग्य कर्मचा-यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सचिन राऊत, राजेश्वरी भडके, कृष्णा पोतदार, लक्ष्मण वाघमारे, सूर्यकांत सुरवसे व प्रथमेश पांचाळ यांनी मोलाचे सहकार्य केले.

