चिवेला : वृत्तसंस्था
मेक्सिकोच्या दक्षिणेकडील ओअक्साका राज्यात आंतरसागरीय रेल्वे रुळावरून घसरली, त्यानंतर रुळावरून इंजिन, अनेक डबेही उलटले. यात १४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ९८ लोक जखमी झाले आहेत. ही रेल्वे मेक्सिकोचे आखात आणि प्रशांत महासागर यांना जोडणा-या एका नवीन रेल्वेमार्गावर धावत होती. या रेल्वे मार्गाचे संचालन मेक्सिकन नौदल करते.
मेक्सिकन नौदलाच्या माहितीनुसार, रेल्वेमध्ये २५० लोक होते, ज्यात ९ क्रू मेंबरचा समावेश होता. हा अपघात चिवेला आणि निजांडा या शहरांदरम्यान एका वळणावर झाला. जखमींपैकी 36 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया शीनबाउम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर सांगितले की, पाच जखमींची प्रकृती गंभीर आहे. त्यांनी वरिष्ठ अधिका-यांना घटनास्थळी पाठवून मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. ही रेल्वे प्रशांत महासागरातील सालिना क्रूझ बंदरापासून अटलांटिक महासागरापर्यंत सुमारे २९० किलोमीटरचे अंतर कापते. ही आंतरमहासागरीय रेल्वे सेवा २०२३ मध्ये तत्कालीन अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी सुरू केली होती. मेक्सिकोच्या दक्षिणेकडील भागात रेल्वे प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तेहुआंतेपेक इस्थमस प्रदेशात पायाभूत सुविधांच्या विकासाचा हा एक भाग आहे.
सरकारची योजना या प्रदेशाला आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी एक धोरणात्मक कॉरिडॉर बनवण्याची आहे, जिथे बंदरे आणि रेल्वे मार्गांनी दोन्ही महासागर जोडले जाऊ शकतील. या अपघातामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे आणि बचाव कार्य सुरू आहे.

