बीड : प्रतिनिधी
भाजपाचे बीडचे आमदार सुरेश धस सध्या खूप चर्चेत आहेत. त्यांनी मस्साजोगचे आमदार संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरल्याने ते कायम टीव्हीवर झळकत आहेत. त्यांच्या जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतरचा जाहीर कार्यक्रम बुधवारी झाला. या कार्यक्रमात धस यांनी मेरे पास देवेंद्र फडणवीसजींचा आशीर्वाद आहे असे म्हणत तुफान टोलेबाजी केली.
दरम्यान, सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सुरेश धस तसेच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार फटकेबाजी केली.
धस यांनी बीडच्या सध्याच्या परिस्थितीवर देखील राजकीय टोलेबाजी केली. ते म्हणाले की, काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना पाठबळ दिल्याने जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती. पण फडणवीस साहेब तुम्ही संतोष देशमुखांच्या प्रकरणात कणखर भूमिका घेतल्याचे म्हणाले.
पुढे बोलताना धस म्हणाले,
मी ‘दीवार’ सिनेमा पाहिला होता. त्यात अमिताभ आणि शशी कपूर भाऊ-भाऊ असतात. निरुपा रॉय त्यांची आई असते. शशी कपूर इन्स्पेक्टर असतो. अमिताभ शशी कपूरला म्हणतो, मेरे पास गाडी है, बंगला है, नोकर है, चाकर है तुम्हारे पास क्या है? त्यावेळी शशी कपूर म्हणतो, मेरे पास माँ है. तसा आईचा आशीर्वाद तुम्हाला आतापर्यंत भेटतोय.
तुमच्यासारखा नशीबवान कोणी नाही. माझी आई गेली. वडील गेले. माझी दुसरी आई जिवंत आहे. माझी आई मी लपवली नाही साहेब. सभागृहात मी विचारले माझ्या आईचे नाव घेऊ का. मी माझ्या दुस-या आईचेही नाव घेतले. साहेब, तेव्हा ब-याच जणांना वाटले मला काही तरी मिळेल. मला मंत्रिपद नाही दिले तरी, मी म्हणतो मला मंत्रिपद नको, पालकमंत्रिपद नको. काही देऊ नका. हे चार टीएमसी, तिकडचे साडेतीन टीएमसी पाणी द्या असे सांगत धस पुढे म्हणाले की मला हिणवतात. काय आहे याचे मुख्यमंत्र्यांपाशी. मला विचारतात, तेरे पास क्या है? मी म्हणतो, मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद असाच ठेवा अशी मागणी धस यांनी यावेळी केली.