16.8 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeमहाराष्ट्रमेळघाटात माकडांचा धुमाकूळ

मेळघाटात माकडांचा धुमाकूळ

अमरावती : प्रतिनिधी
मेळघाटात गेल्या काही वर्षांपासून लाल माकडांची संख्या प्रचंड वाढली आहे. वर्ष-दोन वर्षांपूर्वी धारणी मार्गावर सेमाडोह, कोलकास लगत मार्गावर दिसणारी ही लाल माकडे मेळघाटात आता सर्वत्र धुमाकूळ घालत आहेत. पर्यटन नगरी असणा-या चिखलदरा येथे लाल माकडांच्या त्रासाने पर्यटक त्रस्त होत आहेत. गंभीर बाब म्हणजे मेळघाटातील आदिवासी शेतकरीदेखील माकडांच्या त्रासामुळे हैराण झाले आहेत.

मेळघाटात काळ्या तोंडाची माकडं अनेक वर्षांपासून आहेत. लाल तोंडाची माकडं सेमाडोह, कोलकास परिसरात आधी १५ ते २० च्या संख्येत दिसायची. आज मात्र चिखलदरा, सेमाडोह, कोलकास, माखला, हरिसाल, चुरणी, सलोना, भिलखेडा अशा अनेक गावांमध्ये लाल माकडांनी उच्छाद मांडला आहे. लाल माकडांच्या टोळ्याच आता अनेक गावांत फिरताना दिसतात. ही माकडं फार हट्टी असून, अनेक गावांतील ग्रामस्थ या लाल तोंडाच्या माकडांमुळे त्रस्त झाले आहेत.

शेतात असा घालतात धुमाकूळ
लाल तोंडाची माकडे माणसासारखीच असतात. शेतात मक्याचं कणीस ते माणसांसारखं सोलून खातात. शेतातील टोमॅटो, काकडी सर्व फस्त करतात. शेताला असणा-या तारांच्या कुंपणात विजेचा प्रवाह सोडला तर ते वीज प्रवाह असणा-या तारेला स्पर्श न होऊ देता शेतशिवारात शिरतात, या माकडांसाठी दिवस-रात्र शेतीची राखण करावी लागत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR