कोलकाता : वृत्तसंस्था
अर्जेंटिनाचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या ‘जीओएटी टूर’ कार्यक्रमादरम्यान साल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या गोंधळाच्या चौकशीचे आदेश सरकारने दिल्यानंतर, पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री अरूप विश्वास यांनी आज (दि.१६) आपल्या पदाचा राजीनामा दिला. ममता बॅनर्जी यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. दरम्यान, पश्िचम बंगाल विधानसभा निवडणुका आता काही महिन्यांवर आल्या आहेत. या निवडणुकीपूर्वी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्िथतीत नसल्याने अरुप यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
मेस्सीचा भारत दौरा शनिवारी गोंधळात सुरू झाला. मेस्सी अवघ्या २० मिनिटांत तेथून निघून गेला. यानंतर १५,००० रुपयांपर्यंत तिकीट घेतलेल्या संतप्त प्रेक्षकांनी मैदानात गोंधळ घातला आणि तोडफोड केली. मेस्सीला राज्यातील राजकीय नेत्यांनीच गराडा घातला. तिकीट खरेदी केलेल्या चाहत्यांना त्याची झलक मिळू शकली नाही, असा आरोप प्रेक्षकांनी केला.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सताद्रू दत्ता यांना अटक करण्यात आली. निवडणुकीपूर्वी या घटनेमुळे टीएमसी आणि सरकारला नामुष्की पत्करावी लागली आहे, आणि भाजपने या घटनेचा हवाला देत सरकारवर गैरव्यवस्थापनाबद्दल टीका केली. दरम्यान, न्यायमूर्ती (निवृत्त) असीम कुमार रॉय यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने आपला प्राथमिक अहवाल सादर केल्यानंतर सरकारने अनेक वरिष्ठ अधिका-यांवर कठोर कारवाई केली.

