रक्कम थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात
मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी केली जात आहे. याच पडताळणीअंतर्गत अनेक महिलांचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात आले आहे. असे असतानाच आता उर्वरित लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हफ्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महिलांनी आपापले बँक खाते तपासावे, असे आवाहन केले जात आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली. राज्य सरकारकडून महिलांच्या बँक खात्यात मे महिन्याचे १५०० रुपये टाकण्यात येत आहेत. अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमाही झाले आहेत. तशी माहिती खुद्द महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे मिळत असल्याचे त्यांनी ट्विटद्वारे सांगितले. ‘लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू झाले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास आजपासून सुरुवात झाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे, असे तटकरे म्हणाल्या.