27.2 C
Latur
Friday, November 8, 2024
Homeलातूरमैदानी खेळ-मातीशी नातं जोडून खेळाडूंनी माणुसकीचा विकास करावा : आमदार बाबासाहेब पाटील

मैदानी खेळ-मातीशी नातं जोडून खेळाडूंनी माणुसकीचा विकास करावा : आमदार बाबासाहेब पाटील

अहमदपूर : प्रतिनिधी
या तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘ब’ विभागीय आंतर महाविद्यालयीन मैदानी (मुले व मुली) क्रीडा स्पर्धेच्या प्रसंगी तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर करून मैदानाशी नाते जोडावे. व्यक्तिगत आरोग्य उत्तम राखण्यासाठी तसेच करिअरसाठी खेळाची निवड करून उत्तम मार्गदर्शकांकडून धडे घ्यावेत असे प्रतिपादन आमदार तथा बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाबासाहेब पाटील यांनी उद्घाटन करते वेळी केले.
   यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव होते. यावेळी मंचावर विचार विकास शिक्षण संस्थेचे सचिव अ‍ॅड. पी. डी. कदम, बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक साहेबराव जाधव, नांदेड विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, ‘ब’ विभाग सचिव डॉ. तात्याराव केंद्रे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अझहर बागवान, संजीवनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय चाटे, डॉ. अनिल इंगोले, प्राचार्य डॉ. दत्ता पाटील, प्राचार्य डॉ. एन. एस. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. माने आदी मान्यवर उपस्थित होते.
   यावेळी नांदेड विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने यांनी प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचा क्रीडा क्षेत्रातील इतिहास सांगितला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हे महाविद्यालय कटिबध्द असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी सूत्रसंचालन आणि आभार डॉ. गोविंद काळे यांनी व्यक्त केले. सदरील स्पर्धेसाठी मुला-मुलींचे एकूण २२ संघ सहभागी झाले आहेत. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR