Homeमहाराष्ट्र... मोठ्या मनाने मला क्षमा करा

… मोठ्या मनाने मला क्षमा करा

‘मनुस्मृती’च्या वक्तव्यावर अभिनेते शरद पोंक्षेंनी मागितली माफी

नागपूर : प्रतिनिधी
रोखठोक आणि परखड मतांसाठी नेहमीच चर्चेत राहणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडले आहेत. नागपूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी मनुस्मृतीबद्दल केलेल्या विधानावरून गेल्या दोन दिवसांपासून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. या वक्तव्यानंतर सर्वच स्तरांतून त्यांच्यावर टीकेचा वर्षाव सुरू झाला होता. या वादाचे गांभीर्य लक्षात घेता, शरद पोंक्षे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत वादग्रस्त वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली आहे.

एक व्हीडीओ प्रसारमाध्यमांवर टाकत शरद पोंक्षे म्हणाले की, सध्या माझी दोन वक्तव्ये मीडियाने चालवलेली. एक मी आरएसएसबद्दल बोललेलो आणि दुसरं मनुस्मृती जर वाचली असती, मूळ मनुस्मृती …तर ती जाळली नसती, असे मी बोललो. आता हे बोलण्याचा माझा उद्देश असा आहे की, हिंदुत्व या विषयावर बोलत असताना, हिंदू धर्मातील जे सगळे धर्मग्रंथ आहेत, भगवद्गीता आहे, रामायण आहे, तर हे सगळं आपण वाचतच नाही.

हे जर वाचले तर तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये नेमके काय म्हटले आहे. हा माझा मूळ उद्देश आहे. त्यामुळे मी असे म्हटले सगळे वेद, उपनिषदे संपूर्ण भाषण यूट्यूबवर आहेत, तुम्ही ते बघू शकता. मनुस्मृती मूळ जर वाचली, त्याची अनेक रूपं झाली. आता बाबासाहेबांनी मनुस्मृती जरी जाळली तरी त्यांनी हिंदू कोड बिल बनवताना मनुस्मृतीचा वापर केलेला आहे, आधाराला घेतलेली आहे हे त्यांनी स्वत: म्हटले आहे.

या व्हीडीओमध्ये शरद पोंक्षे पुढे म्हणाले की, तरीसुद्धा मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती, या वक्तव्याने जर कोणी दुखावलं गेलं असेल तर मी क्षमा मागतो. मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज सगळेच आपले दैवत आहेत. माझ्या शब्दांमुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर मोठ्या मनाने मला क्षमा करा, आपण एक भारतीय म्हणून एकसंध उभे राहायला पाहिजे हा माझा मुख्य हेतू आहे असे म्हणत शरद पोंक्षे यांनी माफी मागितली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR