पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील शिवाजीनगर येथील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या २ पदाधिका-यांना अटक केली आहे.
अमित ठाकरे यांच्या महाविद्यालयाच्या पाहणी दौ-यादरम्यान हा प्रकार घडला. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या शेजारी नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचे एका विद्यार्थ्याने अमित ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर अमित ठाकरे यांनी महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना याबाबत जाब विचारला. काही वेळातच मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोदींचा फोटो भिंतीवरून खाली उतरवला. या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वादाला सुरुवात झाली.
अमित ठाकरे सोमवारी शिवाजीनगर येथील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मिळणा-या सुविधा आणि महाविद्यालयातील व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी गेले होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला असल्याचे विद्यार्थ्याने सांगितले. त्यावर अमित ठाकरे यांनी, शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो का लावण्यात आला आहे?, असा सवाल केला. यानंतर मनसेचे पदाधिकारी प्रशांत कनोजिया आणि विक्रांत भिलारे यांनी मोदींचा फोटो तेथून खाली उतरवला. या संपूर्ण घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला.
या घटनेनंतर अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्याच्या कृतीचे समर्थन केले. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, नरेंद्र मोदी यांना एवढ्या उंचीवर नेऊन ठेवू नका की त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी होईल. शासकीय महाविद्यालयात पंतप्रधानांचा फोटो लावण्याचा काही प्रोटोकॉल असेल, तर त्यानुसार फोटो लावण्यास आपली हरकत नाही. मात्र तो फोटो छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या शेजारी लावण्याची गरज काय, असा सवाल अमित ठाकरे यांनी केला. ‘‘मोदींचा फोटो दुसरीकडे लावा; मात्र तो छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नको, अशी भूमिका त्यांनी मांडली.
अमित ठाकरेंसह २० ते २५जणांवर गुन्हा
फोटो हटवल्याच्या घटनेनंतर चतु:शृंगी पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यासह मनसेच्या २० ते २५ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील प्रशांत कनोजिया आणि विक्रांत भिलारे या दोन पदाधिका-यांना रात्री उशिरा अटक केली. त्यामुळे आता अमित ठाकरे यांच्यावरही दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे मनसे आणि राज्य सरकारमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
















