बैठकीत ५ मुद्यांवर मतैक्य, एसआयआरला विरोध, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागणार
– काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी दिली माहिती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इंडिया आघाडीने मोदी सरकारविरोधात पुन्हा एकजुटीची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातून एकूण २५ राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनीही उपस्थिती लावली. या बैठकीत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, एसआयआरबाबत सरन्यायाधीशांना पत्र यासह ५ मुद्यांवर एकमत झाले आणि या मुद्यांसाठी संघर्ष करू, त्यावर काम करू आणि पुढे जाऊ, असा निर्धार बोलून दाखविला.
या बैठकीनंतर खरगे यांनी पत्रकार परिषदेत या बैठकीतील निर्णयाबाबत सर्व माहिती दिली. या बैठकीला कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सपा नेते अखिलेश यादव, राजदचे यशस्वी यादव, महेबुबा मुफ्ती, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांचा सहभाग होता. यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही व्हर्च्युअलच्या माध्यमातून बैठकीत सहभाग घेत आपली मते मांडली.
नुकत्याच पार पडलेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीला तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जींनी हजेरी लावली. या बैठकीपूर्वी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांची गळाभेट लक्षवेधी ठरली. या बैठकीत ५ मुद्यांवर एकमत झाले. इंडिया आघाडी या ५ मुद्यांवर भविष्यात काम करणार असून लढणार आणि पुढे जाणार असल्याचे काँग्रेस अध्यक्ष तथा इंडिया आघाडीचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.
या पाच मुद्यांमध्ये एसआयआर, नीट पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागणार, देशाची आर्थिक स्थितीसंदर्भाने प्रामुख्याने चर्चा झाली. तसेच पुढील बैठक हैदराबाद येथे होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे कॉकरोच जनता पार्टीने पहिल्या आंदोलनात उचलून धरलेला मुद्दाही इंडिया आघाडीच्या बैठकीत प्रकर्षणाने जाणवला. त्यानुसार केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची राजीनाम्याची मागणी करण्याची मागणी लावून धरली जाणार आहे.
दरम्यान, इंडिया आघाडीच्या या बैठकीवर सत्ताधारी भाजप महायुतीच्या नेत्यांकडून टीका होत आहे. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हे दिल्लीतच असल्याने त्यांनी तेथून इंडिया आघाडी आणि काँग्रेस नेत्यांवर टीका केली तर उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला. दरम्यान, आजच्या बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे आणि झारखंडमधून हेमंत सोरेन ऑनलाईन सहभागी झाले होते, त्यांनी देखील या मुद्यांना आपली सहमती दर्शवली.
बैठकीतील प्रमुख ५ मुद्दे
१. लवकरच सरन्यायाधीश यांना एसआयआरवर पत्र लिहिणार
२. धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा झाला पाहिजे
३. आर्थिक स्थिती, बेरोजगारी आणि शेतकरी मुद्यांवर केंद्र सरकारने तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलवावी
४. प्रत्येक दोन महिन्यांनी इंडिया आघाडीची बैठक होणार, पुढील बैठक हैदराबाद येथे होणार
५. पावसाळी अधिवेशनात इंडिया आघाडीतील पक्षांत समन्वय साधला जाणार, दररोज विरोधी पक्षाच्या कक्षात बैठक होणार
पंतप्रधानपदाचा चेहरा हवा : ठाकरे
इंडिया आघाडीच्या आज झालेल्या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी पंतप्रधानपदाचा उमेदवारी निवडला पाहिजे, अशी भूमिका मांडली. खासदार संजय राऊत यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. देशाचे नेतृत्त्व करणारा हा आमचा चेहरा आहे, असे आपण लोकांना दाखवले पाहिजे, असे मत ठाकरे यांनी मांडले. आता आगामी बैठक ऑगस्ट महिन्यात हैदराबाद येथे होणार आहे.
















