लातूर : प्रतिनिधी
एकीकडे मोदी सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा होत आहे. मात्र दुसरीकडे गॅस टंचाईने देश हैराण आहे. त्यामुळे चुली पेटल्या असून लाकडाला (सरपन)मात्र पुन्हा जुने दिवस आले आहेत. लाकडांना सोन्याचा भाव सध्या आला आहे.
स्वयंपाकाचा गॅस महाग त्यातही गॅसचा तुटवडा असल्यामुळे चुलीसाठी लाकूड घेणा-यांची संख्या आता वाढली आहे. त्यामुळे बहुतांश घरात आणि हॉटेल व्यवसायिकानी चूल थाटली आहे. एकूणच पुन्हा लातूर जिल्ह्यातील बहुतांश भागातील नागरिक गॅसऐवजी चुलीवर स्वयंपाक करीत आहेत. मधल्या काळात लाकडाचे भाव आणि विक्री वाढली होती, आधी लाकूड ३ ते ५ रुपयापर्यंत किलो प्रमाणे मिळत होते तर आताही लाकडाच्या किंमती ५ ते ६ रुपये किलो आहेत. त्यामुळे एकूणच लाकडाला पुन्हा जुने दिवस आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे लाकडाची मागणी वाढल्यामुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असून शहरातील लाकडी अड्ड्यात लाकडांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. वृक्ष लागवडी पेक्षा वृक्ष तोडण्यावर जास्त भर असल्याने पर्यावरण प्रेमितून नाराजगीचा सूर उमटत आहे.
















