लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थिरोग तपासणी व उपचार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ७७ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
लातूरचे ज्येष्ठ अस्थिशल्य चिकित्सक डॉ. अशोक पोद्दार लातूर शहरात मोफत आरोग्य शिबीर सुरु करण्याकामी अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या हॉस्पिटलच्या वतीने सातत्याने अशा प्रकारच्या मोफत रोग निदान शिबिरांचे आयोजन केले जाते. आजचे हे शिबीर १७३ वे ठरले. युवा नेते अभिजित देशमुख, लातूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत यांच्या हस्ते या शिबिराचे धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, डॉ. सुरेश भट्टड, डॉ. दीपक गुगळे, डॉ. ज्योती सूळ, डॉ. विश्रांत भारती, डॉ. चेतन सारडा, डॉ. संजय शिवपूजे, रामेश्वर सोमाणी, श्याम धूत, संजय भार्गव, प्रसाद उदगीरकर, विजय रांदड, विजय पस्तापुरे, रतन बिदादा, मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. हॉस्पिटलच्या वतीने सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अभिजित देशमुख यांनी दिलीपराव देशमुख राजकीय, सार्वजनिक जीवनाचे नंदादीप राहिले आहेत. त्यांनी सर्वांना सार्वजनिक सेवेचा विचार दिला असल्याचे सांगून अशा या ज्येष्ठ नेतृत्वास अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आपण कोटी कोटी शुभेच्छा देतो, असे सांगितले. यावेळी डॉ. हर्षवर्धन राऊत, डॉ. अशोक पोद्दार यांनी मनोगत व्यक्त केले. या शिबिरात एकूण ७७ रुग्णांची तपासणी उपचार करण्यात आले. त्यामध्ये ४८ रुग्णांची हाडांच्या ठिसूळतेची, ३६ रुग्णांचे एक्सरे, १८ रुग्णाची रक्त तपासणी तर ३६ रुग्णांना फिजिओथेरपी सुविधा देण्यात आली.

