लातूर : प्रतिनिधी
घर, दुकान, वाहन वापरास इतरांना भाड्याने द्यावे, त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे बँक खाते पैशाचे अमिष दाखवून भाड्याने घेऊन त्याचा वापर सायबर गुन्हेगारीसाठी करुन नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करत असल्याचे आढळून आले असून १ कोटी, ३० लाख १५ हजार ४४४ रुपयांवर डल्ला मारला गेला आहे. पोलिसांनी धडक कारवाई करीत विविध पोलीस ठाण्यांत एकुण १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ऑनलाइन व्यवहारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना सायबर आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. या वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा पोलिसांनी म्युल अकाउंटधारकांविरुद्ध विशेष मोहीम राबवून विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण १० गुन्हे दाखल केले असून या गुन्ह्यांचा सखोल तपास सुरू आहे. गांधी चौक पोलीस ठाणे-५ गुन्हे (एकूण आर्थिक व्यवहार : १,२४,४१,४४८ रुपये), शिवाजीनगर पोलीस ठाणे-२ गुन्हे (एकूण आर्थिक व्यवहार : ५३,३००रुपये), रेणापूर पोलीस ठाणे-२ गुन्हे (एकूण आर्थिक व्यवहार : ४,८९,६९६रुपये), अहमदपूर पोलीस ठाणे-१ गुन्हा (एकूण आर्थिक व्यवहार : ३१,०००रुपये), अशा प्रकारे एकूण १० गुन्हे नोंदविण्यात आले असून, या सर्व गुन्ह्यांमध्ये एकूण १,३०,१५,४४४ रुपये इतक्या रकमेचा आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या कारवाईचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे आर्थिक फसवणुकीचे बळी ठरलेले नागरिक हे देशातील विविध राज्यांतील असले, तरी त्यांच्या फसवणुकीची रक्कम लातूर जिल्ह्यातील काही बँक खात्यांमध्ये जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संबंधित बँक खाते ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे, त्या पोलीस ठाण्याने स्वत:हून तक्रार दाखल करून कलम ३१८(४), ६१(२) व ३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हे नोंदविले आहेत. सदरचा गुन्हा दखल पात्र असून तो अजामीन पात्र आहे व सदर गुन्ह्यातील कलमान्वये आरोपीस ७ वर्षे शिक्षा व द्रव्य दंडाची तरतूद आहे.
म्युल अकाउंट म्हणजे काय?
म्युल अकाउंट म्हणजे दुस-या व्यक्तीच्या सांगण्यावरून किंवा आर्थिक आमिषाला बळी पडून उघडलेले अथवा वापरासाठी दिलेले बँक खाते. सायबर गुन्हेगार अशा खात्यांचा वापर फसवणुकीतून मिळालेली रक्कम जमा करणे, ती दुसरीकडे वळविणे किंवा काढून घेण्यासाठी करतात. अनेक वेळा काही व्यक्तींना ५ ते १० टक्के कमिशनचे आमिष दाखवून त्यांच्या खात्याचा वापर केला जातो. काही खातेधारकांना आपले खाते सायबर गुन्ह्यांसाठी वापरले जात असल्याची माहिती नसते, तर काहीजण जाणीवपूर्वक पैसे कमावण्याच्या उद्देशाने आपले बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक, नेट बँकिंगची माहिती किंवा ओटीपी इतरांना उपलब्ध करून देतात. काही प्रकरणांमध्ये खातेधारक थेट आपले बँक खाते विक्रीही करतात.
अशा प्रकारच्या कृतीत सहभागी झालेल्या खातेधारकांवरही कायदेशीर कारवाई केली जाते. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होऊन अटक होऊ शकते, कारावासाची शिक्षा होऊ शकते, संबंधित बँक खाते कायमस्वरूपी गोठविले किंवा बंद केले जाऊ शकते तसेच त्यांच्या उकइकछ गुणांकनावरही गंभीर परिणाम होतो. त्यामुळे भविष्यात बँक कर्ज किंवा इतर आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात.
















