महाराष्ट्रासह देशात ९२ टक्के पावसाचा अंदाज, चिंता वाढली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय हवामान विभागाकडून आज नैऋत्य मान्सून २०२६ चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला. यावर्षी देशात सरासरीच्या ९२ टक्के पाऊस पडू शकतो, असे म्हटले आहे. म्हणजेच देशात सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसाचे प्रमाण जेव्हा ९० ते ९५ टक्के असते, त्यावेळी सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असते. महाराष्ट्रातदेखील सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम रविचंद्रन यांनी यावर्षीच्या मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांच्या उपस्थितीत राजधानी दिल्लीत आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी नैऋत्य मान्सून २०२६ चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला. यात सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. जेव्हा पावसाचे प्रमाण ९० टक्के ते ९५ टक्के असते, त्यावेळी सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतो. दरम्यान, संपूर्ण देशभरात दीर्घावधी सरासरी ८७ सेंटीमीटर राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला.
भारतीय हवामान विभागाने पाऊस मोजण्याच्या ५ श्रेणी ठरवल्या आहेत. सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. दुस-या श्रेणीत ९० ते ९५ टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस तर तिस-या श्रेणीत ९६ ते १०४ टक्के म्हणजे सामान्य सरासरी इतका पाऊस समजला जातो. पुढील २ श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०५ ते ११० टक्के आणि ११० टक्क्यांच्या पुढे अधिक पाऊस समजला जातो.
जून, जुलै, ऑगस्टपर्यंत
पावसाची स्थिती सामान्य!
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांच्या माहितीनुसार जून, जुलै, ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहणार आहे. त्यातच जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात एल निनो परिस्थिती असणार आहे. त्याचवेळी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये भारतीय समुद्रात सकारात्मक परिस्थिती असल्याची माहिती डॉ. एम. मोहापात्रा यांनी दिली. एल निनोच्या नकारात्मक परिणामाला भारतीय समुद्रातील सकारात्मक परिस्थिती अनुकूल करेल. त्यामुळे एल निनोचा परिणाम जाणवणार नाही, असे डॉ. एम. मोहापात्रा यांनी सांगितले.
शेतक-यांची चिंता वाढणार
यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमकुवत राहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मागच्या काही वर्षांत चांगला पाऊस होत आला आहे. परंतु यंदाच्या अंदाजात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविल्याने चिंता वाढली आहे.
















