26.2 C
Latur
Tuesday, March 18, 2025
Homeलातूरयज्ञ म्हणजे केवळ आहुतीच देणे नव्हे;सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख

यज्ञ म्हणजे केवळ आहुतीच देणे नव्हे;सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख

लातूर : प्रतिनिधी
आमचे ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन च्या अविरत कार्याचा २१०२ व्या दिवसाचा आनंद सोहळा तसेच ज्येष्ठ बागकर्मी यांचा सत्कार समारंभ २ मार्च रोजी जिल्हा उद्योग केंद्र, लातूर येथे आयोजित केला होता. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी उपस्थिती लावून लातूर, लातूरकर आणि पर्यावरणावरील असलेल्या प्रेमाची प्रचिती उपस्थितांना करून दिली.

आदरणीय दिलीपराव देशमुख यांनी आमचे ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशनच्या कामाचे भरभरून कौतुक करत, निसर्ग सेवेसाठी अर्थातच आपलं लातूर हरित लातूर, सुंदर लातूर आणि स्वच्छ लातूर या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी मागील २१०२ दिवसांचा प्रवास हा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.

आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशनच्या सर्वच सदस्यांनी मिळून वृक्षसंवर्धन ही लातूरची एक नवीन संस्कृती निर्माण केल्याचे मत त्यांनी व्यक्त करत, पूर्वी यज्ञ म्हटलं की वृक्षांची आहुती द्यायचे एवढेच माहिती होते, परंतु आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशनच्या सदस्यांनी वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा यज्ञ पेटवला असून या यज्ञात वृक्षांची आहुती दिली जात नसून वृक्ष लागवडीसाठीचा यज्ञ पेटवलेला असल्याचे सांगत या यज्ञाला तेवत ठेवण्यासाठी तुम्ही सर्वजण कष्ट घेत आहातच, आम्ही या यज्ञाकरिता कधीच समिधा कमी पडू देणार नाही, आमचाही या समाजोपयोगी यज्ञात सहभाग असणे ही आमची सुद्धा जिम्मेदारी आहे. आम्ही प्रत्यक्ष हजर जरी राहू शकत नसलो तरी माझे आपल्या कार्यावर बारकाईने लक्ष असते, मी तुम्हा सर्वच सदस्यांना दररोज व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पाहत असतो, मी तनाने जरी तुमच्या सोबत नसलो तरी मनाने मी अविरत तुमच्या सोबतच असतो.

आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन ला येणारी कुठली ही अडचण आपण आम्हाला नि:संकोचपणे सांगा. तुमची अडचण दूर करण्यासाठी आम्ही कायमच आपल्या पाठीशी आहोत. किंवा ती अडचण क्षणात सुटलेली असेल. स्वत:चे पाण्याचे टँकर पाहिजे, पाण्यासाठी बोअर घ्यायचे, सोलार पंप पाहिजे तुम्ही मागणी करा आम्ही ती पूर्ण करू, असे सांगत रु. २११००१ एवढी रक्कम ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशनच्या पुढील कार्यासाठी देणगी स्वरूपात जाहीर केली.

जिल्हा उद्योग केंद्र येथे उभारण्यात आलेल्या अमृत गार्डन, कॅक्टस गार्डन, चाफा गार्डन, रोझ गार्डन खूपच छान असल्याचे सांगत असे असंख्य पॅच आपल्याला शहरात निर्माण करता येतील, त्यामुळे नागरिकांना निवांत बसण्यासाठी, चालण्यासाठी, व्यायामासाठी आणि शुद्ध हवेसाठी सोयीचे आणि गरजेचे असल्याचे सांगितले तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. प्रवीणजी खडके साहेब, यांच्या प्रशासकीय कामाचे तसेच निसर्गावरील प्रेमाचे कौतुक करत एक डोळस अधिकारी आपल्या लातूरला लाभल्याचे समाधान व्यक्त केले.

आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन यांनी आजवर केलेले कार्य हे कृतीस महत्त्व देणारे असून बोलून दाखवण्यापेक्षा कुठलीही गोष्ट कृतीतून दाखवणे श्रेष्ठच असे मत व्यक्त करत पुढील कार्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. वैशाली लोंढे-यादव यांनी केले. त्यांनी मागील २१०२ दिवसांच्या कार्याचा विस्तृत लेखाजोखा सर्वांसमोर मांडला तसेच भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. डॉ. भास्कर बोरगावकर यांनी ज्येष्ठ बागकार्मी यांच्या कार्याचा आढावा, तसेच नागरिकांना निसर्गसेवेची आवड निर्माण होण्यासाठी करावयाचे उपक्रम याबद्दल माहिती दिली. श्वेता लोंढे (माजी नगरसेविका) व सौ. स्वाती घोरपडे (माजी नगरसेविका) यांनी आपल्या मनोगतातून निसर्गसेवेचे महत्त्व तसेच त्यासाठी ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन करत असलेले कार्य याविषयी उपस्थितांना सखोल माहिती दिली.

आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशनचे बाळासाहेब बावणे यांचे टाकाऊ पासून टिकाऊ तसेच निसर्गसेवेकरिताचे उल्लेखनीय कार्याबद्दल आदरणीय दिलीपराव देशमुख यांनी विशेष सत्कार केला.
या कार्यक्रमास माजी आमदार त्रिंबकनाना भिसे, यशवंत भैय्या पाटील माजी चेअरमन रेणा साखर, संभाजी सूळ, लालासाहेब चव्हाण, सचिन दाताळ, बाळासाहेब पाटील, रामदास काळे अध्यक्ष रयत प्रतिष्ठान यांची तसेच लातूर शहरातील निसर्गप्रेमी तसेच ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशनचे सर्वच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिंद्र चाटे व सौ. संगीता घोडके यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. पवन लड्डा यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR