लातूर : प्रतिनिधी
आजच्या वेगवान जीवनात मानसिक तणाव हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, या तणावाचे योग्य व्यवस्थापन केल्याशिवाय यशस्वी होणे शक्य नाही, असे स्पष्ट मत जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केले. ‘टेक-वारी’ उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित ‘मनाची अमर्याद शक्ती आणि तणावमुक्ती’ या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. मानसिक तणावाचे प्रभावी व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शनासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, प्रमुख मार्गदर्शक डॉ. दत्ता कोहिनकर तसेच महसूल कर्मचारी संघटना आणि तलाठी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील महसूल विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले.
मानसिक तणावाचा अतिरेक आरोग्यासाठी हानिकारक ठरतो; परंतु योग्य व्यवस्थापनाद्वारे हाच तणाव व्यक्तीच्या क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी नमूद केले. आपल्यावर सोपविलेली जबाबदारी तणावमुक्त राहून पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचे कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. गतिमान आणि अचूक कामकाजासाठी आग्रही राहिल्यास तणावाची परिस्थिती उद्भवत नाही. त्यामुळे प्रत्येक अधिकारी आणि कर्मचा-याने कामाचे सुयोग्य नियोजन करून प्रत्येक काम अचूकपणे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. ही कार्यशाळा तणावमुक्तीच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आपण जसा विचार करतो, तसे परिणाम आपल्या शरीरावर दिसतात. सतत नकारात्मक विचार किंवा तणावाखाली जगण्याने मानसिक आरोग्य बिघडते. त्यामुळे प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून परिस्थितीला सामोरे जावे, असे सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. दत्ता कोहिनकर यांनी मानसिक तणाव व्यवस्थापनावर मार्गदर्शन करताना सांगितले. तणावमुक्तीसाठी नियमित व्यायाम, सकारात्मक विचार आणि स्वत:ची काळजी घेणे यासारख्या सवयी अंगीकारण्याचा सल्ला त्यांनी दिला. विविध उदाहरणांद्वारे त्यांनी तणाव व्यवस्थापनाच्या प्रभावी पद्धती स्पष्ट केल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांनी प्रास्ताविक केले, तर उद्धव फड यांनी सूत्रसंचालन केले.