लातूर : योगीराज पिसाळ
जिल्हा परिषदेच्या शाळेत नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून शाळेचा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा दर्जा उंचावणा-या शिक्षकांची लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली जाते. मात्र यावर्षी तर शिक्षक दिनापूर्वी शिक्षकांच्या निवड फाईलवर निवड समिती सदस्य व मुख्यकार्यकारी अधिकारी यांची अद्याप स्वाक्षरीच झाली नाही. मग शिक्षक पुरस्काराची यादी मंजूरीसाठी जाणेतर दूरच राहिले. त्यामुळे ५ सप्टेंबर रोजी शिक्षकांचा सन्मान तर सोडच त्यांची यादीही मंजूर झाली नाही. शिक्षक पुरस्कारार्थींची गेल्या पाच वर्षापासून केवळ थट्टाच सुरू असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राथमिक शिक्षण विभाग व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्याकडूनन प्रत्येक तालुक्यातून १ प्राथमिक व १ माध्यमिक विभागातून या प्रमाणे २० शिक्षक व एक दिव्यांग शिक्षक अशा २१ शिक्षकांची जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली जाते. चार वर्षापासून पालकमंत्र्यांना पुरस्कार वितरणासाठी वेळ नसल्याने अद्याप शिक्षकांच्या पुरस्काराचे विरणच झाले नाही.
गेल्यावर्षी प्रमाणे याहीवर्षी शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी शिक्षकामध्ये उत्साह दिसून आला नाही. यावर्षी जि. प. च्या प्राथमीकचे ९, माध्यमीकचे फक्त ३, तर विशेष शिक्षकाचा एक असे १३ शिक्षकांचे प्रस्ताव निवड समितीने मंजूर केले आहेत. निवड समितीमधील एका पदाधिका-याची स्वाक्षरी राहिली आहे. ती झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांची स्वाक्षर होऊन प्रस्ताव छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त यांच्याकडे मंजूरीसाठी पाठवण्याची प्रक्रीया होणार आहे. शिक्षक दिन शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी होत असताना किमान शिक्षक पुरस्काराची यादी मंजूर झाली असती तर थोडा आनंद शिक्षकांना झाला आसता. शिक्षकांची यादीच मंजूर नसल्याने शिक्षकांचा शिक्षक दिनाचा आनंद हिरावला गेला असल्याची चर्चा होत आहे.
पुरस्कार वितरण रखडले
लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५, २०२५-२६ या वर्षांचे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारर्थी निवडले आहेत. तर २०२६-२७ या वर्षाच्या शिक्षकांची जिल्हा निवड समितीने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवडीची प्रक्रीया अंतीम टप्यात आहे. या यादीवर सर्वांच्या स्वाक्ष-या झाल्यानंतर ती यादी छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मंजूरीसाठी लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून पाठवली जाणार आहे. त्या नंतर यावर्षीचे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराची यादीही जाहिर होणार आहे. चार वर्षाच्या निवडीचे पुरस्कार वितरण रखडले आहे.
सोमवारपर्यंत यादी मंजुरीसाठी जाईल
जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी यावर्षी शिक्षकांचे प्रस्ताव कमी आल्याने पुन्हा एकदा प्रस्ताव पाठवण्यासाठी आवाहन करूनही प्राथमिक शिक्षकांचे ९, माध्यमिक शिक्षकांचे ३, तर विशेष शिक्षक १ असे १३ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. सदर काम होण्यासाठी वेळ लागला. समिती सदस्यांच्या स्वाक्ष-या जवळपास होत आल्या आहेत. मुख्यकार्यकारी अधिकारी यांची स्वाक्षरी झाल्यानंतर शिक्षकांच्या पुरस्काराची यादी छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मंजूरीसाठी पाठवली जाईल. सदर यादी सोमवार पर्यंत मंजूर होईल. यादी मंजूर होताच पालकमंत्र्यांशी संपर्क करून येत्या १० ते १२ दिवसात पुरस्काचे वितरण होईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी विकास कुकडे यांनी दिली.
















