भारतात एलपीजी, सीएनजीचा तुटवडा, गॅस सिलिंडरचाही भडका
व्यावसायिक गॅसचा पुरवठा तात्पुरता बंद, हॉटेल, रेस्टॉरंट ठप्प होणार?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्याने युद्धाचा भडका उडाला असून, गेल्या ७ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युद्धामुळे एलपीजी गॅस आणि सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना सिलिंडर तुटवड्याच्या झळा सोसाव्या लागण्याची शक्यता असतानाच केंद्राने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपये तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत ११५ रुपयांची वाढ केली. त्यामुळे घरगुती गॅस ९१३ रुपयांना तर व्यावसायिक गॅस १८८३ रुपयांना मिळणार आहे. आजपासून नवा दर लागू झाल्याने गॅस सिलिंडर महागाईच्या झळा सामन्यांना सोसाव्या लागणार आहेत. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून केंद्राने व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलिंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतला. यामुळे देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड इंडस्ट्रीसह उद्योग ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे दिवसागणिक संघर्ष वाढत आहे. या संघर्षामुळे प्रत्यक्ष युद्धात सहभागी नसलेल्या देशांना याचे परिणाम सोसावे लागत आहेत. जगासमोर कच्चे तेल, एलपीजीच्या पुरवठ्याचे नवे संकट निर्माण झाले आहे तर या युद्धाची झळ आता थेट भारतालाही बसताना दिसत आहे. युद्धामुळे देशात गॅस तुटवड्याची शक्यता वर्तवली जात असतानाच सरकारने गॅसच्या दरात वाढ केली. या परिस्थितीचा विचार करून सरकारने आपत्कालीन अधिकारांचा वापर करत देशातील सर्व तेल रिफायनरी कंपन्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले.
भारत कच्चे तेल, गॅस रशिया, पश्चिम आफ्रिका, अमेरिका, आखाती देश यांच्याकडून घेतो. भारताने अलिकडच्या काळात अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) सारख्या भागीदार देशांसोबत नवीन ऊर्जा पुरवठा व्यवस्था केली. याचा हेतू दीर्घकालीन स्थिर पुरवठा सुनिश्चित करणे आहे. गेल्या दहा वर्षांत भारताने आपल्या तेल पुरवठ्याचे स्रोत २७ देशांपासून ४० देशांपर्यंत वाढवले, जे सहा खंडामध्ये पसरलेले आहे. तरीही युद्धामुळे तेल पुरवठा साखळीबाबत चिंता वाढली आहे.
होर्मुझची नाकाबंदी!
अमेरिका-इस्रायल यांनी इराणविरोधात संघर्ष तीव्र करत जोरदार मारा केला आहे. यामुळे संतापलेल्या इराणने जगाचे नाक दाबणारा निर्णय घेत होर्मुझ सामुद्रधुनीची नाकाबंदी केली आहे. याचा थेट परिणाम भारतावर झाला आहे. याच सामुद्रधुनीतून जगात दुस-या क्रमांकावर एलपीजी भारत आयात करतो. अंदाजे ८५ ते ९० टक्के एलपीजी मध्य पूर्वेतून आयात केला जातो. त्यामुळे चिंता वाढली आहे.
भारताकडून पर्यायाचा विचार
होर्मुझ सामुद्रधुनीमधून पुरवठा बाधित होण्याची शक्यता लक्षात घेता भारत त्याच्या ऊर्जा सुरक्षेसाठी इतर देशांचाही पर्यायांचा विचार करत आहे. सरकारी स्रोतांच्या माहितीनुसार ऑस्ट्रेलिया, कॅनडासारख्या अनेक देशांनी भारताला अतिरिक्त गॅस पुरवठ्याची ऑफर दिली आहे. यावर सरकार काय निर्णय घेते, हे पाहावे लागेल.
३ हजार कार्गो जहाज,
टँकरही अडकले
होर्मूझ मार्ग रोखल्याने तब्बल ३ हजार कार्गो जहाज,जहाज, टँकर विविध बंदरात अडकले आहेत. यामध्ये ३०० पेक्षा जास्त गॅस सिलेंडर आहेत. भारताच्या एकूण नैसर्गिक वायू आयातीच्या किमान ४० टक्के गॅस याच मार्गावरून येतो. नैसर्गिक वायूचीही मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते. एलपीजीचा ८५ ते ९० टक्के भाग सौदी अरेबिया आणि अरबी, आखाती देशांकडून येत असतो. जागतिक स्तरावरही कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत.
पुण्यात व्यावसायिक
गॅस पुरवठा बंद!
पुण्यात व्यावसायिक एलपीजी गॅस पूर्णपणे बंद असल्याने हॉटेल्समध्ये स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध नाही. यामुळे उद्योगाची दिनचर्या प्रभावित होत आहे. दुसरीकडे युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे पुण्यातील सदाशिव पेठेत असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीत गॅसवर चालणा-या ५ दाहिन्या बंद ठेवाव्या लागल्या. गॅस पुरवठा बंद झाल्याने हा निर्णय घ्यावा लागला.

