27.6 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeअंतरराष्ट्रीययुद्ध भडकले

युद्ध भडकले

इस्रायल, अमेरिकेचा इराणवर हल्ला, इराणचेही प्रत्युत्तर, क्षेपणास्त्रांचा मारा

इस्रायलसह अमेरिकेच्या तळांवर प्रतिहल्ला, कतार, बहारिन, यूएई, सौदी अरेबियातील तळांना लक्ष्य
तेहरान : वृत्तसंस्था
इस्रायल आणि अमेरिकेने शनिवारी सकाळी इराणवर हल्ला केल्याने मध्य-पूर्व आशियात युद्धाचा भडका उडाला आहे. इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने त्यांच्या विरोधात युद्धाची घोषणा करत प्रतिहल्ले सुरू केले. इराणने ४०० पेक्षा जास्त बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली असून, इस्रायलवर जोरदार हल्ला चढवला. त्याचवेळी मध्य-पूर्वेतील अमेरिकेच्या तळांना लक्ष्य करीत कतार, बहारिन, यूएई, सौदी अरेबियातही क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यामुळे मध्य-पूर्व आशियात युद्ध आणखी भडकण्याची चिन्हे आहेत. याचे जागतिक स्तरावर भीषण परिणाम होऊ शकतात.

इस्रायल आणि अमेरिकेनं संयुक्त कारवाई लष्करी कारवाई करताना इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर हल्ला केला आहे. भारतीय वेळेनुसार शनिवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी तेहरानसह अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात ही संयुक्त लष्करी कारवाई केली. यात गुप्तचर मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, सर्वोच्च नेते खमेनी यांचे कार्यालय आणि इराणी अणुऊर्जा संघटनेला लक्ष्य केले. या हल्ल्यानंतर खमेनी यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. इराणने इस्रायलवर प्रत्युत्तरादाखल हल्लेही सुरू केले. इराणने सुमारे ४०० क्षेपणास्त्रे डागली.

दरम्यान, इस्रायल-अमेरिकेच्या कारवाईत इराणचे मोठे नुकसान झाले आहे. यात दक्षिण इराणच्या होर्मोजगान प्रांतातील मिनाब शहरातील एका शाळेवर अमेरिका-इस्रायलने हवाई हल्ला केला. त्यातच एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात ८५ विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. तसेच शाळेचे मोठे नुकसान झाले. अमेरिकेने जियोनिस्ट शासनाच्या साथीने देशातील अनेक भागांवर हवाई हल्ले केल्याचा दावा इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने केला. या कारवायांनी इराणी जनता दबावाखाली येईल, असे शत्रूला वाटते. पण इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सशस्त्र दलांनी पलटवार सुरू केला.
जीवनावश्यक वस्तू आणि सेवांचा पुरेसा साठा देशाकडे आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. पुढील सूचना मिळेपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील. बँकांच्या सेवा सुरूच राहतील. सरकारी कार्यालये ५० टक्के क्षमतेने काम करतील, असे सुरक्षा परिषदेकडून सांगण्यात आले. संभाव्य धोका लक्षात घेऊनही इराणने आंतरराष्ट्रीय समुदाय आणि विविध देशांशी संवाद साधण्याचा मार्ग निवडला. तणाव टाळण्याचा आमचा प्रयत्न होता, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. युद्ध टाळण्यासाठी हरत-हेचे प्रयत्न करण्यात आले. पण सद्यस्थितीत देशाची सुरक्षा करणे आणि शत्रूच्या हल्ल्याचा मुकाबला करणे अनिवार्य आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
मध्य, पूर्व आशियावर
युद्धाचे महासंकट
इराणवर अमेरिका आणि इस्रायलने हल्ला केल्याने मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या हल्ल्याने संपूर्ण मध्य पूर्व आशियासमोर युद्धाचे संकट कोसळले आहे. इराणने आसपासच्या देशात असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केले. लष्करासह नौदल तळांवरही इराणने हल्ले चढवले. इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. त्यामुळे युद्धाची आग संपूर्ण अरब देशांमध्ये पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

इराणचे संरक्षणमंत्री ठार
इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे संरक्षण मंत्री अमीर नसीरजादेह आणि रिवोल्यूशनरी गार्डचे कमांडर मोहम्मद पकपूर यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी ही माहिती दिल्याचा दावा रॉयटर्सने केला. इराणने अद्याप तरी यावर कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

हल्ल्यात ८५ विद्यार्थिनी ठार
अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त कारवाईदरम्यान झालेल्या बॉम्बहल्ल्यात शाळेत शिकणा-या ८५ विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हल्ल्यात शाळेची २ मजली इमारत उद्ध्वस्त झाली. हल्ल्याच्या वेळी शेकडो विद्यार्थिनी शाळेत उपस्थित होत्या. या शाळेचे नाव ‘शाजारे तैय्यबेह एलिमेंटरी स्कूल’ असे असून ही मुलींची प्राथमिक शाळा आहे.

इराणने ४०० क्षेपणास्त्रे डागली
इराणने इस्रायलवर सुमारे ४०० क्षेपणास्त्रे डागली आणि कतार, कुवेत, जॉर्डन, बहरीन, सौदी अरेबिया आणि युएईमधील अमेरिकन तळांना लक्ष्य केले. शिवाय इराणने यूएईच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दुबईवरही हल्ला केला.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR