लातूर : प्रतिनिधी
नियम धाब्यावर बसवुन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणा-या युनिपोलचा परवाना तात्काळ रद्द करा या मागणीचे निवेदन दि. ८ ऑगस्ट रोजी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मानसी मीना यांना देण्यात आले. लातूर शहरातील मुख्य रस्त्याच्या मधोमध उभे केलेल्या अवाढव्य जाहीरात फलक (युनिपोल) उभारताना प्रशासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन अजिबात करण्यात आलेले नाही. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वारंवार अपघातास कारण बनत आहेत. छत्रपती शाहु महाराज चौकात युनिपोलच्या अर्धवट कामामुळे नुकताच एका दुचाकीचालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे लातुर शहरातील विविध भागात विशेषत: रहदारी असलेल्या मुख्य रस्त्यावर उभारण्यात आलेल्या (युनिपोल) जाहिरात फलकाची लातुर मनपा प्रशासनाने तपासनी करुन नियम बा उभारलेल्या युनिपोलचा परवाना तात्काळ रद्द करावा, अशी मागणी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून करण्यात आली.
लातूर शहरात रस्त्याच्या मधोमध मोठ्या आकाराचे युनिपोल उभारले आहेत. युनिपोलच्या उभारणीपासुनच अनेकांनी यावर आक्षेप घेतला आहे. मात्र तरीही मनपाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. यावर लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांनी शिष्टमंडळासोबत लातूर मनपा आयुक्त श्रीमती मानसी मीना यांची शुक्रवारी दुपारी त्यांच्या दालनात भेट घेत युनिपोलचा आकार, उभारणीचे ठिकाण व त्याचा संरचनात्मक मजबुती याबाबत योग्य त्या यंत्रणेकडून तपासणी करण्याची मागणी केली. तसेच अवाढव्य युनिपोल मुळे शहरातील छत्रपती शाहु महाराज चौकात युनिपोलच्या अर्धवट कामामुळे एका दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागला आहे व एक महिलाही गंभीर यामुळे जखमी झाली असल्याचे निदर्शनास आणुन देण्यात आले.
यावेळी माजी उपमहापौर कैलास कांबळे, अॅड. फारुक शेख, प्रा. प्रविण कांबळे, प्रविण सूर्यवंशी, डॉ. बालाजी सोळुंके, गोरोबा लोखंडे, आसिफ बागवान, तबरेज तांबोळी, नागसेन कामेगावकर, आयुब मणियार, दत्ता सोमवंशी, विजय गायकवाड, राजकुमार कत्ते, गिरीश ब्याळे, विजय गायकवाड, राहुल डुमणे, कुणाल वागज, अॅड. गणेश कांबळे, राजू गवळी, मैनुद्दीन शेख, अब्दुल्ला शेख, पिराजी साठे, करीम तांबोळी, बालाजी गवळी, पवनकुमार गायकवाड, फारुक शेख, ख्वॉजापाशा शेख, शेख पाशा यांच्यासह लातुर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे विविध सेलचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

