निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील औराद शहाजानी येथील युनिव्हर्सल पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. २४) बालदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विठ्ठल विठ्ठल नामघोष, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि अभंगांच्या गजरात निघालेल्या या दिंडीत शाळेतील सुमारे ८०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे संपूर्ण औराद नगरी भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेली.
दिंडीतील मुख्य आकर्षण ठरलेल्या भव्य ‘रिंगण’ सोहळ्यात सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध सहभाग घेतला. अभंगांच्या तालावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रिंगण उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. शाळेच्या आवारातून निघालेली दिंडी छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्री बालाजी मंदिर, मठ गल्ली, स्वामी विवेकानंद चौक मार्गे मार्केट यार्डातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोहोचली. संपूर्ण मार्गावर बालवारक-यांनी फेर धरत अभंग गात विठ्ठलनामाचा गजर केला. दिंडीत विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बालवारक-यांचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी गावक-यांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.
दिंडीदरम्यान समाजातील विविध घटकांनीही पुढाकार घेत विद्यार्थ्यांसाठी सेवा उपक्रम राबविले. यतीराज झंवर यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली तर श्री गोपाल काबरा आणि श्री चनवीर अंबुलगे यांनी विद्यार्थ्यांना बिस्कीटांचे वाटप केले. औराद पोलिस ठाण्याच्या कर्मचा-यांनी वाहतूक नियोजन आणि सुरक्षेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. मार्केट यार्डातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दिंडीचा समारोप झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी भक्तिगीते, भजने व सांस्कृतिक नृत्य सादर केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक व सामाजिक महत्त्व तसेच संत परंपरेचे विचार समजावून सांगितले. शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे हा भक्तिमय सोहळा शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
















