नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. दोन्ही राज्यांतील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, हजारो गावे पाण्याखाली गेली आहेत. राज्यातील ७ जिल्हे पुराच्या विळख्यात सापडले असून, सुमारे १० लाख लोकांना याचा फटका बसला आहे. गंगेसह १० प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. आतापर्यंत पुरात ११ जणांचा बळी गेला आहे. पाटणा जिल्ह्यातील १४ पंचायतींना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये संततधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. मुरादाबादमध्ये रामगंगा नदीला आलेल्या पुरात एक धक्कादायक घटना घडली. एक दुचाकीस्वार पुरात वाहून गेला, जो सुमारे २२ तास एका झाडावर बसून होता. अखेर बचाव पथकाने त्याची सुखरूप सुटका केली. मध्य प्रदेशात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनाने मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग-३०५ वरील औट-सैंज मार्ग बंद झाला आहे. राज्यातील ३६० हून अधिक रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक भागांचा संपर्क तुटला आहे.
उत्तराखंडात बचावकार्य वेगात : उत्तरकाशी येथे बचाव पथकांना मोठे यश मिळाले आहे. २० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढून मातली हेलिपॅडवर आणले. धराली आणि हर्षिल यासारख्या दुर्गम भागांत अडकलेल्या नागरिकांना अन्न आणि पाण्याची पाकिटे पोहोचवली जात आहेत. आतापर्यंत सुमारे १ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि बचाव पथके हाय अलर्टवर आहेत.

