पुणे : प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या तोंडावर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा भीषण प्रकार समोर आला असून, दुधामध्ये प्रथमच ‘अल्फॉक्स-२००’ हे अत्यंत घातक रसायन भेसळीसाठी वापरले जात असल्याचे आढळले आहे. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक प्रयोगशाळेने ही माहिती दिली आहे. दुधामध्ये आतापर्यंत केवळ डिटर्जंट किंवा युरिया यांचा भेसळीसाठी वापर केला जात होता. मात्र, राज्यात प्रथमच ‘अल्फॉक्स-२००’ हे रसायन दुधात आढळले आहे. दुधामध्ये काही दिवसांपूर्वी हे रसायन आढळल्याची माहिती प्रयोगशाळेतील सूत्रांनी दिली.
प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अल्फॉक्स’ हे प्रामुख्याने कापड उद्योग, चर्म उद्योग आणि औद्योगिक डिटर्जंट म्हणून वापरले जाणारे रासायनिक द्रव आहे. हे रसायन पाणी आणि तेलाला एकत्र बांधून ठेवण्याचे काम करते. याच गुणधर्माचा गैरफायदा घेऊन भेसळखोर पाणी, थोडे तेल आणि अल्फॉक्स एकत्र करून हुबेहूब पांढरे शुभ्र कृत्रिम दूध तयार करतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
वर्ख, अखाद्य रंगापासून सावध राहण्याच्या सूचना
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईंना मागणी असते. मिठाई आकर्षक दिसण्यासाठी त्यावर चांदीचा वर्ख लावला जातो. परंतु, शुद्ध चांदी महाग असल्याने अनेक व्यापारी त्याला पर्याय म्हणून अॅल्युमिनियमच्या पापुद्र्याचा वापर करतात. ही भेसळ साध्या डोळ्यांनी ओळखणे कठीण असते. तसेच, ते आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. तसेच, मिठाईमध्ये वापरले जाणारे रंगही भेसळयुक्त असण्याची शक्यता असल्याने अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना दक्षतेचे आवाहन केले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अस्सल चांदीचा वर्ख हा स्पर्श केल्यास हाताला चिकटणारा आणि त्याचे पापुद्रे लगेच वेगळे होणारा असतो, तर अॅल्युमिनियमचा वर्ख हा किंचित जाड अन् हाताला चिकटला, तरी लवकर पापुद्रा पडत नाही. चांदीचा वर्ख हा लगेच विरघळतो, तर अॅल्युमिनियमचा वर्ख विरघळत नाही.
















