पॅरिस : वृत्तसंस्था
युरोपीय अंतराळ संस्थेचा एक जुना उपग्रह पृथ्वीच्या दिशेने वाटचाल करत आहे. ८ सप्टेंबर रोजी हा उपग्रह वायुमंडळात पुनर्प्रवेश करणार आहे. वायुमंडळात दाखल होताच तो पेटू लागेल. अंतराळ संस्था या उपग्रहाला नियंत्रित पद्धतीने पृथ्वीवर कोसळविणार आहे, जेणेकरून अंतराळात यामुळे कचरा फैलावू नये. याकरिता दक्षिण प्रशांत महासागर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.
सालसा उपग्रह सुमारे १.३० लाख किलोमीटरचे अंतर कापून पृथ्वीवर येणार आहे. मागील वर्षी युरोपीय अंतराळ संस्थेने एओलस वेदर सॅटेलाइटला पृथ्वीवर नियंत्रित पद्धतीने कोसळविले होते. अशाप्रकारे उपग्रहाला पृथ्वीवर आणण्याच्या प्रक्रियेला गायडेड री-एंट्री म्हटले जाते.
युरोपीय अंतराळ संस्थेने २००० पासून सलग ४ एकसारखे उपग्रह अंतराळात पाठविले होते. त्यांची नावे सालसा, रंबा, टँगो आणि सांबा अशी होती. या उपग्रहांचे काम पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर नजर ठेवणे आहे. या चारही उपग्रहांचा अंतराळात एक क्लस्टर तयार करण्यात आला होता.
अंतराळात वाढणारा कचरा विचारात घेता ‘ईएसए’ने सालसा उपग्रहाची गायडेड री-एंट्री करविण्याची योजना आखली आहे. अंतराळात कुठल्याही प्रकारचा कचरा न सोडता हा उपग्रह पृथ्वीवर परतणार आहे.