23.4 C
Latur
Sunday, March 8, 2026
Homeसंपादकीय विशेषयुवाशक्तीचा आयपीएल

युवाशक्तीचा आयपीएल

दीड दशकांपेक्षा अधिक काळापासून आयपीएलचा भारतात बोलबाला असून त्यामुळे भारतीय क्रिकेट मंडळाची आर्थिक स्थिती चांगलीच सुधारली आहे. याशिवाय देश विदेशातील अनेक तरुणांना भारीभक्कम पैसे देऊन त्यांना त्यांचे स्वप्न साकार करण्याची संधीही मिळत आहे. म्हणूनच आयपीएलला कोट्याधीश करणारी कंपनी असेही म्हटले जाते. यंदाचे वर्ष ‘मिनी लिलावा’चे होते. परंतु यातही समीर रिझवी, शुभम दवे, कुमार कुशाग्र, रॉबिन मिंज आणि एम. सिद्धार्थसारख्या पहिल्या पायरीवर असलेले खेळाडू कोट्याधीश झाले. काहींना तर एवढे पैसे मिळाले की, तेवढे पैसे तीन दशकांपूर्वीच्या क्रिकेटपटूंना आपल्या संपूर्ण आयुष्यातही कमवता आले नाही.

यंदा ‘अनकॅप्ड’ खेळाडूंत सर्वात मोठी लॉटरी लागली ती मेरठच्या समीर रिझवीची. अनकॅप्ड खेळाडू म्हणजे ज्यांना अद्याप आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही, असे खेळाडू. यावेळी असे काही अ‍ॅनकॅप्ड खेळाडू चर्चेत होते, ज्यांना आतापर्यंत आयपीएलमध्येही खेळण्याची संधी मिळाली नव्हती. समीरला चेन्नई सुपरकिंग्जने ८.४ कोटी रुपयांत खरेदी केले. विशषे म्हणजे या २० वर्षीय क्रिकेटपटूने अलिकडेच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि त्याने फारसे क्रिकेटही खेळलेले नाही. त्याने यावर्षी यूपी टी-२० लीगमध्ये धमाल उडवून दिली. त्यांमुळे त्याने अनेक आयपीएल फ्रंचाईजीचे लक्ष वेधून घेतले. या लीगमध्ये त्याने नऊ सामन्यांत दोन शतकांसह ४५५ धावा केल्या. याप्रमाणे नागपूरमध्ये पानटपरी चालविणारे बद्रीप्रसाद यांचा मुलगा शुभम शर्मा याला राजस्थान रॉयल्सने ५.६ कोटी रुपयांत खरेदी केले. एवढे पैसे मिळतील, अशी अपेक्षाही त्याने बाळगली नव्हती. कुमार कुशाग्रला दिल्ली कॅपिटल्सने ७.२ कोटी रुपयांत, रॉबिन मिंजला गुजरात टायटन्सने ३.६ कोटी रुपयांत आणि एम. सिद्धार्थला लखनौ सुपरजायंट्सने २.४ कोटी रुपयांत खरेदी केले होते. आयपीएलने त्यांच्या करियरच्या सुरुवातीलाच चार चांद लावले आहेत. या पंखाच्या आधारे आता किती झेप घ्यायची हे त्यांच्या हातात आहे. याप्रमाणे त्यांचा राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

मुळात आयपीएलचा फॉर्मेटच अनकॅप्ड खेळाडूंची मागणी नोंदविणारा आहे. प्रत्येक संघाला निश्चित संख्येत अनकॅप्ड खेळाडूंना घ्यावे लागते आणि यासाठी ते वर्षभर तरुणांच्या शोधात असतात आणि त्यांना घेण्यासाठी ते सर्वशक्तनिशी प्रयत्न करतात. सर्व फ्रंचाईजीना एक गोष्ट ठाऊक असते आणि ती म्हणजे अनकॅप्ड खेळाडू कितीही सक्षम असला तरी त्याचा संघ हा बळकट होऊ शकत नाही. कारण अनकेदा तरुण ऐनवेळी अपयशी ठरताना दिसतात, परंतु जे यशस्वी होतात, त्यांना भविष्यात चांगली रक्कम मिळू लागते. फ्लॉप खेळाडूंना तात्काळ संघाबाहेरचा रस्ता दाखविला जातो. आयपीएल लिलाव म्हणजे चमत्काराला नमस्कार असे म्हणता येईल. यासंदर्भात आपण जयदेव उनाडकटचे उदाहरण घेऊ. त्याला २०१८ मध्ये ११.५ कोटी रुपयांत खरेदी केले. मात्र तो आगामी वर्षात छाप पाडू शकला नाही. परिणामी आता त्याची किंमत १.६ कोटींवर आली. उमेश यादवचे मूल्य देखील दोन कोटींपर्यंत घसरले आहे. गेल्यावर्षी चांगली कामगिरी करत त्याला ५.८ कोटी रुपये मिळाले होते. बहुसंख्य तरुण खेळाडू स्टार होतात आणि दुस-याच वर्षी ते लुप्त होतात.

वेगवान गोलंदाज कामरान खानला तर दिवंगत गोलंदाज शेन वॉर्न हा ‘टॉरनॅडो’ म्हणायचा. पण पहिल्याच हंगामात हा हीरो शैलीवरून वादात अडकला आणि तेथेच ढेपाळला. अशा खेळाडूंत नाथू सिंह आणि पवन नेगीसह अनेक खेळाडूंचा समावेश करता येईल. आयपीएलने क्रिकेटचा स्तर उंचावला की नाही हा चर्चेचा मुद्दा राहू शकतो. परंतु आयपीएलने क्रिकेटपटूंना मालामाल केले, हे मात्र खरे. यावरून कोणाचाही आक्षेप नसेल. फ्रंचाईजी हे आपल्या गरजेनुसार खेळाडूंवर पैसा ओततात. या कारणांमुळे क्रिकेटप्रेमींना ज्या खेळाडूला अधिक पैसा मिळेल, असे वाटत असते, तसा विचार संघ देखील करत नाही. यासाठी आणखी एक उदाहरण घेऊ. यावेळी ऑस्ट्रेलियाला विश्वविजेता करण्यात सिंहाचा वाटा उचलणा-या ट्रेविस हेड आणि न्यूझीलंडसाठी तीन शतकांसह ५६५ धावा करणा-या रचिन रविंद्रला पाहा. सर्वांना वाटले क त्यांच्यावर धनलक्ष्मीचा वर्षाव होईल, परंतु असे घडले नाही.

ट्रेविस हेडला सनराईज हैदराबादने ६.८ कोटी रुपये आणि रचिनला चेन्नई सुपर किंग्जने १.८ कोटी रुपये खरेदी केले. आता प्रश्न असा की, असे का घडले? याचे प्रमुख कारण म्हणजे मिनी लिलावात साधारपणे संघ आपली कमकुवत बाजू मजबूत करण्यावर भर देतात. यावेळी सर्व संघांनी द्रुतगती गोलंदाजांवर प्रामुख्याने पैसा लावला आणि यामागचे कारण म्हणजे २०२४ च्या आयपीएल सत्रात जलदगती गोलंदाजांना राहणारे महत्त्व. आतापर्यंत जलदगती गोलंदाजाला एकच बाऊंन्सर टाकण्याची मुभा होती. त्यामुळे एकदा बाऊन्सरचा सामना केला की तो पुन्हा टाकणार नाही, याबाबत फलंदाज निर्धास्त असायचे. परंतु आता फलंदाजांवर बाऊन्सरची दहशत राहणार आहे. परिणामी जलदगती गोलंदाजांना चांगली कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे. या कारणांमुळेच सर्व संघ आपल्या गोलंदाजांची फळी मजबूत करत आहेत. त्यामुळे साहजिकच चांगल्या फलंदाजाकडे दुर्लक्ष केले गेले.

-मिलिंद सोलापूरकर

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR