नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) आता नागरी सेवा पूर्वपरीक्षा झाल्यानंतर तात्पुरती उत्तरपत्रिका जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही उत्तरपत्रिका प्रकाशित केली जायची. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत परीक्षार्थीला वाट पाहावी लागायची. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या एका याचिकेला प्रतिसाद म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोगाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला.
या प्रकरणात न्यायालयाने यापूर्वी वरिष्ठ वकील जयदीप गुप्ता यांची अमिकस क्युरिए म्हणून नियुक्ती केली होती तर वकील प्रांजल किशोर त्यांना सहाय्य करत होते. अमिकस क्युरिएने पूर्व परीक्षानंतरच्या दुस-या दिवशीच ही उत्तरतालिका प्रकाशित करावी, अशी सूचना केली होती. १३ मे रोजी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आयोगाने असे केले तर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असून परीक्षेच्या अंतिम टप्प्यात अनिश्चितता आणि विलंब होईल, असा शेरा दिला होता . मात्र त्यानंतर २० सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या एका नव्या प्रतिज्ञापत्रात आयोगाने सदर याचिका प्रलंबित असताना आयोगाने यावर सखोल विचार विनिमय केला असून त्यानंतर पूर्व परीक्षेनंतर तात्पुरती उत्तरपत्रिका प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे, असा निर्णय कळवला.
त्यानुसार आता पूर्व परीक्षा झाल्यानंतर तात्पुरती उत्तरतालिका प्रसिद्ध केली जाईल. परीक्षार्थींना यावर आक्षेप नोंदविण्याची संधी दिली जाईल. प्रत्येक हरकतीसोबत किमान ३ अधिकृत संदर्भस्रोत द्यावे लागतील. या हरकती विषयतज्ज्ञांच्या समितीकडे पाठवण्यात येतील. तज्ज्ञ अंतिम उत्तरतालिका निश्चित करतील आणि त्यावर आधारित निकाल लागेल. शेवटी अंतिम उत्तरतालिका पूर्ण निकालानंतर प्रसिद्ध केली जाईल. यूपीएससीने सांगितले की, हा जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे आणि तो लवकरात लवकर लागू केला जाईल, असे म्हटले.
सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेत नागरी सेवा पूर्व परीक्षेचे गुण, कट ऑफ गुण आणि उत्तरपत्रिका ही संपूर्ण परीक्षा पूर्ण झाल्यानंतर प्रकाशित करण्याचे कोणतेही तर्कसंगत कारण नाही. त्यामुळे अपयशी उमेदवारांना योग्य व प्रभावी उपाय शोधण्याची संधी हिरावली जाते. उत्तरपत्रिका, कट ऑफ गुण आणि उमेदवारांचे गुण त्वरित जाहीर केल्यास उमेदवारांना चुकीच्या मूल्यमापनावर आक्षेप घेण्याची आणि पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया पारदर्शक करण्याची संधी मिळेल, असे म्हटले होते.
उमेदवारांकडून
हरकती मागवणार
परीक्षेला बसलेल्या उमेदवारांकडून याबाबत आक्षेप व निवेदने मागवली जातील. सर्व पैलूंचा सखोल विचार केला जाईल आणि त्यानंतर उत्तरपत्रिका अंतिम ठरवली जाईल. ही अंतिम केलेली उत्तरपत्रिका लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेच्या निकालांच्या घोषणेचा आधार असेल. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर अंतिम उत्तरपत्रिका प्रकाशित केली जाईल, असेही आयोगाने स्पष्ट केले.

