शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
येरोळ गट व गणात काँग्रेस पक्षाला वाढता पाठिंबा मिळत असून येथील जनतेने विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे युवा नेते योगेश बिरादार यांनी केले. ते येरोळ गणात प्रचारदरम्यान बोलत होते. या प्रसंगी काँग्रेस नेते प्रभाकर बंडगर हे उपस्थित होते.
योगेश बिरादार म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांत काँग्रेसने सर्वसामान्य शेतकरी, कामगार, युवक व महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकासाचे राजकारण केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात भरीव काम काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झाले आहे. त्याच विकासाच्या कामांची पोचपावती म्हणून आज येरोळ गट, गणातील जनता काँग्रेसच्या पाठीशी उभी आहे.
ते पुढे म्हणाले की, सध्याच्या सत्ताधा-यांनी केवळ आश्वासने दिली मात्र प्रत्यक्षात शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले. वाढती महागाई, बेरोजगारी आणि शेतीमालाला योग्य दर न मिळाल्यामुळे जनता त्रस्त आहे. या परिस्थितीत काँग्रेसच जनतेच्या प्रश्नांना न्याय देऊ शकते, असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला आहे.
येरोळ गट उमेदवार शितल रमेश सोनवणे, येरोळ गण अहिल्याबाई प्रभाकर बंडगर, हिप्पळगाव गण ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रचारास मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी काँग्रेसच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. सभेच्या शेवटी ‘विकासासाठी, विश्वासासाठी काँग्रेस’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

