औसा : प्रतिनिधी
विविध विभागांच्या अनेक योजना तयार आहेत मात्र त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभाग अत्यंत गरजेचा आहे. जलसंधारणाच्या कामांमध्ये केवळ ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ एवढ्यावर न थांबता पाण्याची बचत आणि योग्य व्यवस्थापन यावरही भर देणे गरजेचे आहे. जलसंधारण योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेतली जाणार असून, पावसाळ्यापूर्वी ती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. अपूर्ण राहिलेल्या मनरेगा आणि विहिरींच्या कामांना पुढील १५-२० दिवसांत पूर्ण केल्यास नवीन कामे देण्यात येतील आणि निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिली.
औसा तालुक्यात जलसंधारणाला नवी चालना देणा-या ‘जलसमृद्ध औसा अभियान’ टप्पा १ चा शुभारंभ १३ एप्रिल रोजी फत्तेपूर येथे झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, क्रिएटीव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. परीक्षित पवार, टाटा मोटर्स फाउंडेशनचे प्रमोद घायाळ, पंचायत समिती सभापती गंगाबाई कोदळीकर, उपसभापती अमोल पाटील, सभापती चंद्रशेखर सोनवणे, संतोष मुक्ता, सदाशिव जोगदंड, संदिपान शेळके, सुभाष पवार, श्याम पाटील, रवी चिलमे, व्यंकट पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र शासन, क्रिएटीव्ह फाउंडेशन, टाटा मोटर्स फाउंडेशन आणि नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त भागीदारीतून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड आपल्या पूर्वानुभवांचा उल्लेख करीत म्हणाले की, २००३ ते २००८ दरम्यान लातूर येथे कार्यरत असताना औसा तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई होती. ‘त्या काळात आंदूरपर्यंत हिरवळ दिसत नव्हती आणि पंधरा दिवसांनी पाणी मिळायचे मात्र आता परिस्थितीत सकारात्मक बदल दिसत आहे, या बदलाला अधिक गती देण्यासाठी जलसमृद्ध अभियान निर्णायक ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जलसंधारण, लोकसहभाग आणि शाश्वत विकास यांचा संगम साधणारे हे अभियान औसा तालुक्यास जलसमृद्ध बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना यांनी सर्वांनी एकत्रित येऊन गाव विकासासाठी काम करण्याचे आवाहन करीत लातूर जिल्हा जलमय करण्याच्या उद्दिष्टाने शासन आपल्याला सर्वतो मदत करण्यास तयार असून यामध्ये लोकसहभागाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

