मुंबई : वृत्तसंस्था
राम गोपाल वर्मा दिग्दर्शित सुपरहिट फिल्म ‘रंगीला’ला प्रदर्शित होऊन तब्बल ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. ८ सप्टेंबर १९९५ रोजी रिलीज झालेली ही फिल्म त्या काळी बॉक्स ऑफिसवर मोठी हिट ठरली होती. आता ही फिल्म नव्या रूपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आपल्या एक्स अकाउंटवर ‘रंगीला’ चा पोस्टर शेअर करत री-रिलीजची घोषणा केली आहे. त्यांनी लिहिले, ‘रंगीला ४ के डॉल्बीमध्ये री-रिलीज होत आहे. आमिर खान, जैकी श्रॉफ, उर्मिला मातोंडकर आणि ए.आर. रहमान यांना खूप शुभेच्छा. रंग पुन्हा परत येत आहेत.’
या पोस्टरमध्ये चित्रपटातील वेगवेगळे सीन दाखवले असून संपूर्ण लीड कास्टही दिसत आहे. ‘रंगीला’ हा एक लव्ह ट्रँगल आहे. ‘रंगीला’ने प्रदर्शना वेळी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ए.आर. रहमानचे संगीतही त्या काळी प्रचंड गाजले. या चित्रपटासाठी रहमानला सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार, राम गोपाल वर्मा यांना सर्वोत्कृष्ट कथा, तसेच जैकी श्रॉफ यांना सपोर्टिंग अॅक्टर पुरस्कार मिळाला होता.
















