22.6 C
Latur
Sunday, December 14, 2025
Homeमहाराष्ट्ररत्नागिरीत ‘प्रहार’ची एंट्री

रत्नागिरीत ‘प्रहार’ची एंट्री

५ ते ६ जागांवर उमेदवार उतरवणार

रत्नागिरी : प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. बच्चू कडूंनी सांगितले की, प्रहार जनशक्ती पक्ष आता रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत ५ ते ६ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. या निर्णयामुळे कोकणातील राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, आतापर्यंत कोकणातील राजकारण शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसपुरतेच मर्यादित होते. मात्र, प्रहार पक्षाने थेट नगरपरिषदेच्या रणांगणात उतरण्याची तयारी दर्शवल्याने स्थानिक पातळीवर नवा राजकीय खेळ सुरू होण्याची शक्यता आहे. कडूंनी सांगितले की, रत्नागिरीसह कोकणातील मतदारांनी प्रहारच्या कामाचा आणि भूमिकेचा विचार करावा, कारण प्रहार नेहमी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष आहे.

बच्चू कडूंनी निवडणूक प्रक्रियेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. विशेषत: ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर त्यांनी तीव्र शंका व्यक्त केली. मतदान करताना आपण कोणाला मत दिले हे आपल्यालाच समजत नाही. प्रामाणिकपणे मतदान करणा-याचं मत कुठे जातं हे समजत नाही. संविधानाने मतदाराला माहितीचा अधिकार दिला आहे, पण तो प्रत्यक्षात नाकारला जातो, असं ते म्हणाले. त्यांनी पुढे आरोप केला की, निवडणूक आयोगाने पारदर्शकता राखली नाही तर लोकांचा विश्वास उडेल. ईव्हीएममधूनच भ्रष्टाचार सुरू आहे. मशीनसमोर लोक उभे करतात आणि मग मतांची चोरी होते, अशी तीव्र टीका त्यांनी केली.

बच्चू कडूंनी याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगालाही थेट लक्ष्य केलं. निवडणूक आयुक्तांना नोटांच्या गड्ड्या मिळाल्या असतील, त्यामुळेच गोंधळ सुरू आहे, असा संताप व्यक्त करत त्यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्यभरात मतमोजणीच्या वेळी लोकांच्या भावना दाबल्या जातात. लोकांनी मतदान केले, पण निकाल वेगळा लागतो. मग लोकशाही कुठे राहिली? असा सवालही त्यांनी केला. या वक्तव्यांमुळे प्रहार पक्षाचा आवाज पुन्हा एकदा आक्रमकपणे राज्यात घुमताना दिसत आहे.

नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव
एकूणच, रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत आता नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. बच्चू कडूंनी मैदानात उतरण्याची केलेली घोषणा ही केवळ एका निवडणुकीपुरती मर्यादित न राहता कोकणात प्रहार जनशक्ती पक्षाचा पाया मजबूत करण्याच्या दिशेने पहिले पाऊल मानले जात आहे. त्यामुळे आगामी दिवसांत रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील निवडणुकीचे वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR