मुंबई : प्र्रतिनिधी
राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. खरीप हंगामात काहीच हाताशी आलेले नसताना रबी हंगामही शेतक-यांच्या हातून निसटण्याची शक्यता आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या रबी हंगामातील पिकांवर संकट येण्याची चिन्हे आहेत. विशेषत: कोरडवाहू भागांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरण्याचा इशारा केंद्र सरकारने दिला असून आता दुष्काळी भागांमध्ये अन्नधान्य तुटवडा भासणार आहे.
काही राज्यांमध्ये जमिनीत अतिरिक्त ओलावा राहण्याची समस्या निर्माण होऊ शकते. तर कमी पाऊस झालेल्या भागांमध्ये पिकांना दीर्घकाळ पाण्याच्या ताणाला सामोरे जावे लागू शकते. देशात अन्नधान्य स्वयंपूर्णतेसाठी पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. हवामान बदल हे आता दूरचे संकट राहिलेले नसून एक वस्तुस्थिती बनल्याचे केंद्रीय कृषी सचिव अतिश चंद्र यांनी नमूद केले.
रबी हंगामासाठी सरकारने आतापासूनच नियोजन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे, एल निनो संकटाच्या पार्श्वभूमीवर कृषि विद्यापीठाकडूनही शेतक-यांना आवाहन करण्यात येत आहे.
एकूण रबी क्षेत्र सुमारे ६३८ लाख हेक्टर
आधीच पावसाने दडी मारल्याने राज्यात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. येत्या ऑक्टोबरपासून रबी पिकांची पेरणी सुरू होत असतानाच आता एल निनोचे संकट समोर उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत आगामी रबी हंगामावर मोठा परिणाम झाला असून शेतकरी तर अडचणीत येणारच..मात्र थेट देशात अन्नधान्याचा तुटवडाही निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे आतापासूनच सरकारने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
पुण्यात लष्करी अळीचे संकट
दरम्यान, पुण्याच्या भोर तालुक्यातील काही ठिकाणी मका पिकावर लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला असून यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आधीच कमी प्रमाणात पडलेला पाऊस.. त्यात ऐन वाढीच्या अवस्थेत असलेल्या मक्यावर या रोगाने हल्ला केल्यामुळे तालुक्यातील शेतकरी कमालीचे हवालदिल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बदलणा-या हवामानामुळे लष्करी अळीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे काही भागांत शेतातील मका पिकाचे नुकसान झाले असून, उत्पादनात मोठी घट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
पाऊस ते महागाईपर्यंतची साखळी
पाऊस कमी पडला तर काय होईल? हा प्रश्न तसा खूपच साधा वाटतो. पण भारतासारख्या देशात त्याचे उत्तर फक्त छत्री आणि शेतीपुरते मर्यादित नाही. पाऊस कमी म्हणजे धरणात कमी पाणी, जमिनीत कमी ओलावा, विहिरींमध्ये भूजल पुनर्भरण कमी, पिकांसाठी पाणी कमी उपलब्ध, काही भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई, कदाचित दुष्काळदेखील आणि या सा-याचा एकत्रित परिणाम म्हणजे अन्नधान्याची महागाई अशी त्याची साखळी असते.
















