30 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeमहाराष्ट्ररमजानमुळे खजुराची मागणी वाढली

रमजानमुळे खजुराची मागणी वाढली

मुंबई : प्रतिनिधी
रमजान महिन्यात रोजा सोडताना खजूर खाण्याची परंपरा असल्यामुळे खजुराच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे खजुराच्या किमतीतही १५ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना परवडणा-या बहरी प्रकारच्या खजुराला विशेष मागणी आहे. ६५ रुपये किलो दराने मिळणारा साधा खजूर सध्या ८० रुपये किलो दराने विकला जात आहे.

रमजानचा महिना असल्याने बाजारात विविध प्रकारचे खजूर उपलब्ध झाले आहेत. यामध्ये १५० रुपये किलो दराचा बहरी आणि ३०० रुपये किलो दराचा माझाफाती खजूर सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरत आहे. तसेच मेडजुल, अजवा, अंबरी, किमिया, झहिद (इराण), सौदी आणि सुक्करी यांसारख्या दर्जेदार खजुरांनाही मोठी मागणी असून त्यांच्या किमतीतही वाढ झाली आहे.

अजवा खजुराला अधिक पसंती
रमजानमध्ये धार्मिक महत्त्वामुळे अजवा खजुराला विशेष मागणी आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबरांशी संबंधित मानला जाणारा अजवा खजूर सध्या बाजारात सुमारे १५०० रुपये किलो दराने विकला जात आहे. सौदी अरेबियातील नावर जुमेरा खजुरासाठी सुमारे ३०० रुपये किलो मोजावे लागत आहेत. ट्युनिशियामधील खजूर ३३० ते २५०० रुपये किलो दरात उपलब्ध आहेत.
सौदी अरेबियातून आयात केलेले अजवा आणि अंबर खजूर सर्वाधिक पसंतीस उतरले आहेत. याशिवाय इराण आणि इराकमधूनही खजूर आयात होतात. या खजुरांचे दर एक हजार रुपयांपासून पुढे आहेत.

आरोग्यवर्धक खजूर
खजूर हे आरोग्यवर्धक फळ मानले जाते. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि विविध जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. रोजा सोडल्यानंतर खजूर शरीराला तत्काळ ऊर्जा देतो आणि अशक्तपणा कमी करतो. त्यातील पाण्याचे प्रमाण शरीराला हायड्रेशन देते, तर नैसर्गिक साखर सहज पचत असल्याने पोटावर ताण येत नाही. फायबरमुळे पचनक्रिया सुधारते व बद्धकोष्ठता टाळता येते. तसेच अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म सूज कमी करण्यास मदत करतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR